२५ वर्षांपूर्वीचे 'चुकभूल द्यावी घ्यावी' नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात येणार रंगभूमीवर, अक्षय मुडावदकर एका नव्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:19 AM2023-09-18T10:19:47+5:302023-09-18T10:20:00+5:30
ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचं गाजलेलं चुकभूल द्यावी घ्यावी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे.
ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचं गाजलेलं चुकभूल द्यावी घ्यावी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक ही नवी जोड़ी या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. अभिनेत्री अक्षया नाईकचा या नाटकातील लूक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सादर करण्यात आला होता. त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या नाटकातील अभिनेता अक्षय मुडावदकरचा लूक आणि नाटकाचे नाव जाहीर केल्यामुळे या नाटकाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नाटकात दिसणार हे कलाकार
नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. केतकी प्रवीण कमळे यांनी निर्मिती केलेल्या "चुकभूल द्यावी घ्यावी" नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन,नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत.
नाटकाला प्रेक्षकांचा मिळाला होता भरभरून प्रतिसाद
पंचवीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या "चूकभूल द्यावी घ्यावी" या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता. अतिशय हलकंफुलकं मनोरंजक असलेल्या नाटकाचं खूप कौतुक झालं. जुनं ते सोनं या म्हणीनुसार प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच मनोरंजक अनुभव नव्या रुपात देण्यासाठी या नाटकाची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. कसदार लेखनाला उत्तम अभिनयाची साथ असल्यानं हे नाटक रसिकांचं नक्कीच पुरेपुर मनोरंजन करेल यात शंका नाही.