३१ दिवस म्हणजे आव्हान ; अभिनयाचं आणि चित्रीकरणाचंही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 09:04 AM2018-07-03T09:04:52+5:302018-07-03T09:12:46+5:30
महाराष्ट्राचा लाडका 'श्री' अशी ओळख मिळविलेला हा नट आपल्याला आणखी एका आव्हानात्मक सिनेमात पहायला मिळणार आहे.
नावीन्यपूर्ण अभिनय सादर करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणं आणि ते अबाधित ठेवणं कलाकारांसमोरील मोठं आव्हान असतं. आव्हानात्मक करियरला आपलंसं करून अभिनेता शशांक केतकर वाटचाल करत आहे. महाराष्ट्राचा लाडका 'श्री' अशी ओळख मिळविलेला हा नट आपल्याला आणखी एका आव्हानात्मक सिनेमात पहायला मिळणार आहे. येत्या २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा '३१ दिवस' या सिनेमात शशांक प्रमुख भूमिकेत आहे. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी.एस. बाबू निर्मित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित '३१ दिवस' सिनेमात 'मकरंद' या धेय्यवेड्या तरुणाची भूमिका तो साकारतोय. याबद्दल शशांक म्हणतो, हा सिनेमा आणि या सिनेमातील माझं कॅरेक्टर थेट प्रेक्षकांना अपील होणारं आहे. सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा तुमच्या आमच्यातील असल्यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना हा सिनेमा जवळचा नक्की वाटेल. मकरंद हा कलाक्षेत्रात नाव कमवू पाहणारा होतकरू आणि उमदा तरुण आहे. अंध मुलांना नाटक शिकवण्याच्या संधी पासून ते थेट एका मोठ्या बॅनरचा सिनेमा दिग्दर्शित करण्यापर्यंतचा प्रवास करत असताना मकरंदच्या स्वप्नांचा डोलारा असा काही कोसळतो की नव्याने काही सुरुवात होईल ही शक्यताच दाट काळोखात विरून जाते. मात्र त्याच्या आयुष्यातील मुग्धा (मयुरी देशमुख) आणि मीरा (रीना अगरवाल) त्याच्या आधारवड बनतात. आता या आमच्या त्रिकुटाला नेमकं काय नाव द्यायचं हे प्रेक्षकांनीच ठरवावं. मनाने तरुण असलेल्या प्रेक्षकांना भावेल अशा स्वरूपात लेखक उमेश जंगम यांनी कथा लिहिलेली आहे. महाराष्ट्राचा लोकप्रिय 'श्री' म्हणून शशांक केतकरची छाप असली तरीही ३१ दिवस मधील चॅलेंजिंग मकरंद पाहण्यासाठी एक दिवस तरी नक्की काढला पाहिजे. येत्या २० जुलै रोजी ३१ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.