'माझं घर माझा संसार'ला ३५ वर्षे पूर्ण, या सिनेमातील अभिनेत्रीनं वयाच्या ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:32 PM2022-07-06T16:32:41+5:302022-07-06T16:33:08+5:30
दृष्ट लागण्या जोगे सारे, हसणार कधी बोलणार कधी या गाण्यांतून या अभिनेत्रीला अमाप लोकप्रियता मिळाली.
राजदत्तचे दिग्दर्शन ‘माझं घर माझा संसार’ हा चित्रपट बऱ्याच प्रेक्षकांनी पाहिला असेलच. ३ जुलै १९८७ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. रत्नाकर मतकरी यांच्या माझं काय चुकलं या नाटकावर आधारित हा चित्रपट होता. अजिंक्य देव, मुग्धा चिटणीस, रिमा लागू, यशवंत दत्त, राजन ताम्हाणे, आसावरी जोशी, रुही बेर्डे, जयराम कुलकर्णी, नीलिमा बोरवणकर ही कलाकार मंडळी या चित्रपटात होती. नुकतेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
'माझं घर माझा संसार' या चित्रपटातील नायिका म्हणजे दिवंगत अभिनेत्री मुग्धा चिटणीस हिचा हा एकमेव अभिनित केलेला मराठी चित्रपट ठरला. दृष्ट लागण्या जोगे सारे, हसणार कधी बोलणार कधी या गाण्यांमुळे मुग्धाला अमाप लोकप्रियता मिळाली. आजही हे गाणं लोकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त मुग्धा चिटणीसने कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ऑल इंडिया रेडिओमध्ये ती कार्यक्रम सादर करत होती. मुग्धा चिटणीसने उमेश घोडके यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
खेदजनक बाब म्हणजे वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षीच १० एप्रिल १९९६ रोजी कॅन्सरच्या गंभीर आजाराने मुग्धा चिटणीसने जगाचा निरोप घेतला. कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा तिची मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती. तिच्या मृत्यूनंतर मुलगी ईशा आजी आजोबा लेखक अशोक चिटणीस आणि डॉ शुभा चिटणीस यांच्यासोबत मुंबईत राहिली. उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचे प्रेम दिले. शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत पाठवले.
ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केले आहे. अमेरिकन सरकारने लॉ अँड सायन्स विभागात तिला प्रशिक्षण देऊ केले. मुग्धा चिटणीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ आजही ठाण्यात मुग्धा चिटणीस घोडके कला संस्कृती प्रतिष्ठान तर्फे कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.