३६५ दिवस भरणार 'ऑनलाइन फिल्म बाजार', स्वप्निल जोशी अन् सरकारच्या पुढाकाराने पूर्ण होणार गरजा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 04:04 PM2023-04-03T16:04:55+5:302023-04-03T16:06:02+5:30
मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या संकल्पनेतून ऑनलाइन फिल्म बाजार पोर्टल सुरू करण्यात येणार
‘इफ्फी’, ‘एनएफडीसी’, ‘कान’सारख्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये भरणाऱ्या फिल्म बाजारमध्ये निर्माते आणि लेखक-दिग्दर्शक-तंत्रज्ञ भेटतात. त्यामुळे असे बाजार क्रिएटिव्ह करण्यासाठी फायदेशीर ठरतात. असा बाजार केवळ फिल्म फेस्टिव्हलपुरता न भरविता आता ३६५ दिवस ऑनलाइन पद्धतीने भरणार आहे. राज्य सरकारच्या पुढाकाराने भरविला जाणारा हा बाजार मराठी निर्माते आणि लेखक-दिग्दर्शक यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरून सिनेसृष्टीसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास अभिनेता स्वप्नील जोशी याने व्यक्त केला. फिल्मसिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वप्नील बोलत होता.
मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या संकल्पनेतून ऑनलाइन फिल्म बाजार पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती देण्यात आली. फिल्म बाजारच्या धर्तीवर विकसित करण्यात येणाऱ्या फिल्म बाजार पोर्टलसाठी सरकारच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे समितीचे अध्यक्ष आहेत.
स्वप्नील जोशी, दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक संजय जाधव, उद्योजक केतन मारू आणि संदीप घुगे समितीचे सदस्य आहेत.
सरकारच्या वतीने प्रथमच चित्रपट लेखक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.
अडचण असल्यास पोर्टलशी संपर्क साधा
मराठी चित्रपट उद्योगाला अशा व्यासपीठाची गरज होती. मराठी चित्रपटकर्मींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारची मान्यता घेऊन असे पोर्टल सुरू होत असल्याबद्दल कोठारे यांनी समाधान व्यक्त केले. पुढील सहा महिन्यांमध्ये हे पोर्टल पूर्णपणे कार्यरत होणार आहे; मात्र पोर्टलचे काम प्रत्यक्षदर्शी सुरू झाले असून, यापुढेही ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने काम होणार असल्याचे स्वप्नील म्हणाला. चित्रपट वितरणासाठी प्रत्यक्ष चित्रपटगृहे, दूरचित्रवाणी वाहिनी आणि ओटीटीच्या माध्यमातून सहकार्य कसे करता येईल, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे मारू म्हणाले.