राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ४ कलाकृतींना ५ पुरस्कार; ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:01 AM2024-08-17T07:01:18+5:302024-08-17T07:02:34+5:30
‘आणखी एक मोहेंजोदारो’, ‘वारसा’, ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ने देखील पटकावले पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. त्यात चार मराठी कलाकृतींना पाच पुरस्कार मिळाले आहेत. ‘वाळवी’, ‘आणखी एक मोहेंजोदारो’, ‘वारसा’, ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ यांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.
परेश मोकाशी दिग्दर्शित आणि स्वप्निल जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते अभिनित ‘वाळवी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
‘आणखी एक मोहेंजोदारो’ या ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक अशोक राणे यांच्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक/ऐतिहासिक/संकलन पुरस्कार मिळाला आहे. त्याची निर्मिती राजेश पेडणेकर व गायत्री पेडणेकर यांनी केली आहे.
‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटासह सर्वोत्कृष्ट नॅरेशन व व्हॉइस ओव्हरचा पुरस्कार मिळाला आहे. याची निर्मिती-दिग्दर्शन साहिल वैद्य यांनी केले, तर व्हॉइस ओव्हर सुमंत शिंदे यांनी दिला आहे. सर्वोत्कृष्ट आर्ट्स/कल्चर फिल्मचा पुरस्कार निर्माता-दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ला मिळाला आहे.
मल्याळम चित्रपट ‘अट्टम’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
आनंद एकरशी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट ‘अट्टम: द प्ले’ ला सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि कन्नड हिट ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक तमिळ चित्रपट ‘थिरुचित्रंबलम’साठी नित्या मेनन आणि गुजराती चित्रपट ‘कच्छ एक्स्प्रेस’साठी मानसी पारेख यांना विभागून देण्यात आले. ‘उंचाई’ या हिंदी चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.
माझ्या आयुष्यातील हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे ‘शब्द’ नाहीत.
-स्वप्निल जोशी, अभिनेता, ‘वाळवी’
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. हे आमच्या संपूर्ण टीमचे यश आहे.
- परेश मोकाशी, दिग्दर्शक, ‘वाळवी’
अंगठेबहाद्दर असलेल्या कामगारांनी एक गाव वसवले. ते दाखवण्याचा प्रयत्न ‘आणखी एक मोहेंजोदारो’मध्ये केला आहे. १९८३मध्ये झालेल्या संपाने या गावाचे मोहेंजोदारो झाल्याचे आता सर्वदूर पोहोचेल.
- अशोक राणे, लेखक, दिग्दर्शक
वारसा माहितीपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या मर्दानी खेळाचे स्वरूप आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारा हा मर्दानी खेळाचा वारसा मांडला आहे.
- सचिन सूर्यवंशी, निर्माता-दिग्दर्शक
माझ्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या वृत्तपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. मनुष्य आणि निसर्गाचे नाते उलगडणारी आणि डोंगरामध्ये शूट केलेली ही फिल्म आहे.
- सोहिल वैद्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेता