Vandana Gupte : पुन्हा शुभमंगल सावधान; लग्नाच्या ५०व्या वाढदिवशी वंदना गुप्तेंचं हटके सेलिब्रेशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:21 AM2023-03-21T11:21:13+5:302023-03-21T11:36:17+5:30
Vandana Gupte : होय, लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी वंदना गुप्ते यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली. या लग्नाचा एक व्हिडीओ वंदना गुप्ते यांनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीसोबतच मालिकांमधून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप पडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते ( Vandana Gupte ). मराठी सोबतच हिंदी कला विश्वातही वंदना गुप्ते यांनी स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. नुकतीच वंदना गुप्ते यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली. आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. काल वंदना गुप्ते यांचा छोटेखानी लग्नसोहळा पार पडला. होय, लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी वंदना गुप्ते यांनी पती शिरीष गुप्ते यांच्यासोबत पुन्हा लग्नाच्या आणाभाका घेतल्या.
५० वर्षांपूर्वी वंदना गुप्ते व शिरीष हे दाम्पत्य लग्नबेडीत अडकलं होतं. काल त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा झाला. कुटुंबीयांच्या साक्षीने या जाेडप्यानं पुन्हा एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. या लग्नाचा एक व्हिडीओ वंदना गुप्ते यांनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. सोबत एक पोस्ट सुद्धा.
माझी वहिनी आमच्या लग्नासाठी अमेरिकेहून आली. माझी भाची कॅनडाहून आली. माझी लेक स्वप्ना वेस्टइंडिजवरून आली. सगळे आमच्या आनंदात सहभागी झालेत. घरीच लग्नाची तयारी झाली आणि आम्ही दोघांनी ते अविस्मरणीय क्षण आम्ही पुन्हा जगले. सर्वाधिक आनंद कशाचा होता तर, आमची मुलं आमच्या लग्नाला हजर होती. आमचा हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार, असं वंदना यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अभिनेत्री वंदना गुप्ते ५० वर्षांपूर्वी पेशाने वकील असलेल्या शिरीष गुप्ते यांच्या सोबत विवाहबंधनात अडकल्या होत्या. हा त्यांचा प्रेमविवाह होता. वंदना गुप्ते या प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या. आपल्या आईमुळे वंदना यांना गायनाची गोडी लागली. एकदा गाण्याच्या कार्यक्रमात लावणी गाताना मनोरमा वागळे यांनी वंदना यांना पाहिलं आणि तिथेच ‘ पद्मश्री धुंडिराज’ या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळवून दिली. त्यानंतर कमलाकर सोनटक्के यांच्या ‘जसमा ओडन’ या नाटकात काम मिळालं. हे नाटक पाहायला शिरीष गुप्ते तिथे आले होते. शिरीष गुप्ते त्यावेळी वकिलीचं शिक्षण घेत होते. मात्र नाटक पाहायची त्यांना विशेष आवड होती. नाटकाच्या प्रयोगाला शिरीष यांनी वंदना यांना पहिल्यांदा पाहिलं आणि पाहताच क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले. पुढे एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यावर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्नही केलं.