‘६६ सदाशिव'चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:31 AM2019-04-16T11:31:07+5:302019-04-16T11:39:11+5:30
’६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.
’६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकिज प्रा. लि.’ यांची असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.
या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रविण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, संगीतकार नरेंद्र भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर वाद – विवादासाठी प्रसिद्ध आहे, याच पुण्यात ६६ वी कला अर्थात शास्त्रशुद्ध वाद घालण्याच्या शिकवणी भोवती ’६६ सदाशिव’ची कथा असल्याचे या टीजर मधून दिसते. यापूर्वी आलेल्या पोस्टर मध्ये ‘६६ व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम!’ अशा आशयाचे एक पुस्तक मोहन जोशी यांच्या हातात दिसते. या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची जी उत्सुकता निर्माण झाली होती ती या भन्नाट टीजर मधून अधिक वाढली गेली आहे.
’६६ सदाशिव’ चित्रपटात मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रविण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, प्रणव रावराणे, विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर महेश मांजरेकर, आसावरी जोशी, विजय निकम विशेष भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात तीन गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत आहे. एका वेगळ्या कलेची ओळख करून देणारा ’६६ सदाशिव’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.