66th National Film Awards 2019: 'भोंगा' वाजला; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी झेंडा फडकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 04:36 PM2019-08-09T16:36:27+5:302019-08-09T17:44:45+5:30
गतवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.
संपूर्ण भारतीय कलाविश्वासे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत मानाच्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे तर आयुष्यमान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ या मराठी चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ’ याच चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या (चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे तर आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केलेल्या पाणी या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
भोंगा
दिग्दर्शकः शिवाजी लोटन पाटील
पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट
पाणी
दिग्दर्शकः आदिनाथ कोठारे
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)
हिंदी चित्रपटांमध्ये ‘अंधाधुन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अंधाधुन’चा अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’साठी दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘पॅडमॅन’ हा अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘बधाई हो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.