68th National Film Awards : 'माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले...'; राहुल देशपांडेंची राष्ट्रीय पुरस्कारावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:07 PM2022-07-23T12:07:50+5:302022-07-23T12:28:17+5:30
68th National Film Awards : यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे यांना जाहिर झाला आहे.
यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसंच सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन पुरस्कारदेखील अनमोल भावे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी मिळाला आहे.
या पुरस्काराबाबत राहुल देशपांडे म्हणतात, ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली.’’
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या यशाबद्दल म्हणतो, ‘’हा क्षण खूप मौल्यवान आहे. ‘मी वसंतराव’ची गाणी हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि या गाण्यांना राहुल देशपांडे यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. आणि आज त्याच्या या मेहनतीचा गौरव झाला आहे, याचा आम्हांला आनंद आहे.’’
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, आणि निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे.