खुळ्या भावंडाची इरसाल श्टोरी..., 'फसक्लास दाभाडे'चा मजेशीर टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:02 IST2024-12-23T18:01:27+5:302024-12-23T18:02:18+5:30
Fussclass Dabhade Teaser : 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

खुळ्या भावंडाची इरसाल श्टोरी..., 'फसक्लास दाभाडे'चा मजेशीर टीझर रिलीज
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'यल्लो यल्लो' हे गाणं आणि त्यावरील रिल पाहायला मिळत आहेत. हे गाणं आहे 'फसक्लास दाभाडे' या सिनेमातील. या गाण्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade Movie) चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेमंत ढोमे यांचे चित्रपट नेहमीच वास्तविकतेला धरून असतात. त्यातील पात्रे नेहमीच आपल्या आजूबाजूची, आपल्या घरातील असतात आणि म्हणूनच त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचे वाटतात. असेच एक तुमच्या आमच्या सारखे कुटुंब प्रेक्षकांना 'फसक्लास दाभाडे' मध्ये पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये हसतं-खेळतं दाभाडे कुटुंब दिसत असून भावंडांमधील भांडणे, कुरबुरी यात दिसत आहेत. हे सगळे दिसत असतानाच त्यांच्यातील घट्ट बॉण्डिंगही दिसत आहे. दाभाडेंच्या घरातील या तीन खांबांना भेटणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
आठवणींना उजाळा देणारा एक फोटो अल्बमच-हेमंत ढोमे
चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की, फसक्लास दाभाडे हा फक्त एक चित्रपट नाही तर कुटुंबातील विविध पैलूंना हसत-खेळत उलगडणारी एक सफर आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या जुन्या क्षणांचा, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देणारा एक फोटो अल्बमच आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आपलासा वाटेल याची खात्री आहे.
खुळ्या भावंडांची ही इरसाल स्टोरी प्रेक्षकांना २४ जानेवारीपासून मोठ्या पडद्यावर पाहाता येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित 'फसक्लास दाभाडे'चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओज करत आहे.