पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:40 PM2024-05-20T13:40:03+5:302024-05-20T13:40:53+5:30
लोक दोन ते तीन तासांपासून उन्हात उभे आहेत. आदेश बांदेकरही संतापले.
आज देशात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. नागरिक सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र पवईत मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून केंद्रावरील EVM मशीनच बंद पडले आहेत. नागरिक उन्हातच केंद्रावर उभे आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) हे देखील तिथे वैतागले. त्यांनी संतप्त व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
आदेश बांदेकर मतदानासाठी केंद्रावर पोहोचले. मात्र मशीनच बंद असल्याचं तिथे सर्वांना कळलं. लोक दोन ते तीन तासांपासून उन्हात उभे आहेत. व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले, "मी आत्ता पवई केंद्रावर आहे, हिरानंदानीसारखा सुशिक्षित एरिया आहे. हिरानंदानी फाऊंडेशन शाळेच्या ठिकाणी बऱ्याच मशीन बंद झाल्या आहेत. दोन-तीन तासांपासून मतदार रांगेत उभे आहेत. उन्हात उभे आहेत. वयोवृद्ध तर माघारी परतलेत. कोणीही अधिकारी नीट उत्तरं देत नाही. नोडल ऑफिसर काय करताएत?"
आदेश बांदेकरांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. बोगस मतदान, EVM मशीनचा घोळ यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हीच लोकशाही का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.'लोकशाही आणि संविधानाची विटंबना सुरु आहे' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.