'…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'चा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 04:46 PM2018-09-28T16:46:32+5:302018-09-28T16:53:57+5:30
वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत '…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.
मराठी कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास लवकरच '…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनय क्षेत्रात आपला असा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या मातब्बर कलाकाराचा प्रवासासोबतच या चित्रपटातून त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवरही भाष्य करण्यात येणार आहे. तसेच या कलाकाराच्या प्रवासात त्या काळच्या इतरही लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका होत्या. त्याच भूमिका उलगडण्यासाठी अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचीही वर्णी लागली आहे.
वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. पुन्हा उघडणार पडदे , होणार टाळ्यांचा कडकडाट, रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार…, असे सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण करणारे कॅप्शनसुद्धा देण्यात आले आहे.
पुन्हा उघडणार पडदे , होणार टाळ्यांचा कडकडाट,
— Viacom18 Marathi (@Viacom18Marathi) September 28, 2018
रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार…
‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’
८ नोव्हेंबरhttps://t.co/klSOn6MzRO@unbollywood@NikhilSane_@subodhbhave@sumrag@sonalikulkarni@viacom18marathi@colorsmarathi
रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार यासारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधील भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या अद्वितीय प्रवासाची गोष्ट आपल्याला सिनेमा रुपात अनुभवता येणार आहे. यात डॉ. घाणेकरांच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार आहे तर सुलोचना दिदींची भूमिका सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी ...आणि काशिनाथ घाणेकर या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या 'आणि काशिनाथ घाणेकर'मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा अभिनेता म्हणून झालेला उदय आणि अस्त दाखवण्यात येणार आहे. '...आणि काशिनाथ घाणेकर' हा सिनेमा यंदाच्या दिवाळीत 8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.