'आणीबाणी'च्या काळात उडणार केशवच्या लग्नाचा बार? प्रविण तरडे पहिल्यांदाच दिसणार विनोदी भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 16:16 IST2023-07-17T16:15:54+5:302023-07-17T16:16:27+5:30
Pravin tarde :आणीबाणी या सिनेमातील प्रविण तरडे यांच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. या सिनेमात ते विनोदी भूमिका साकारणार आहेत.

'आणीबाणी'च्या काळात उडणार केशवच्या लग्नाचा बार? प्रविण तरडे पहिल्यांदाच दिसणार विनोदी भूमिकेत
मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि उत्तम अभिनय कौशल्य असलेला अभिनेता म्हणजे प्रविण तरडे (pravin tarde). आजवर त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्येच आता आणीबाणी हा त्यांचा नवा सिनेमा येऊ घातला आहे. नुकताच या सिनमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या सिनेमाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. यामध्येच आता प्रविण तरडे यांच्या भूमिकेवरील पडदाही दूर झाला आहे.
आणीबाणी या सिनेमातील प्रविण तरडे यांच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. या सिनेमात ते विनोदी भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच ते अशा वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. प्रत्येक गावात एक तरी असा अवलिया असतो ज्याला गावातील लहानमोठ्या साऱ्या काही गोष्टी माहित असतात. यात बऱ्याचदा ते गावात घडणाऱ्या एखाद्या घटनेला जबाबदारही असतात. अशाच केशव नामक व्यक्तीची भूमिका प्रविण तरडे या सिनेमात साकारणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचा लूक यावेळी जास्त चर्चेत येत आहे.
"या भूमिकेने मला आजवर न मिळालेली व्यक्तिरेखा साकारण्याची संधी दिली. ‘आणीबाणी’ मध्ये उत्तम कलाकार व टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता," असं प्रविण तरडे म्हणाले.
दरम्यान, या सिनेमात उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत.