'माझ्या राजा रं'नंतर 'आया रे तुफान'; मराठमोळ्या गीतकाराचा 'छावा'निमित्त बॉलिवूडमध्ये डंका; म्हणतो-
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 10:07 IST2025-02-07T10:07:33+5:302025-02-07T10:07:54+5:30
'छावा' सिनेमातील आया रे तुफान गाणं मराठमोळा लेखत क्षितीज पटवर्धनने लिहिलंय. त्यानिमित्त क्षितीजने त्याच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत (kshitij patwardhan, chhaava)

'माझ्या राजा रं'नंतर 'आया रे तुफान'; मराठमोळ्या गीतकाराचा 'छावा'निमित्त बॉलिवूडमध्ये डंका; म्हणतो-
काल 'छावा' (chhaava movie) सिनेमातील 'आया रे तुफान' (aya re toofan) गाणं रिलीज झालं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला समर्पित हे गाणं आहे. हे गाणं ए. आर. रहमान यांच्या बुलंद आवाजात आपल्यासमोर आलं. या गाण्याची खासियत म्हणजे, 'आया रे तुफान' गाणं मराठमोळे लेखक आणि पटकथाकार क्षितीज पटवर्धन (kshitij patwardhan) यांनी लिहिलंय. क्षितीज यांनी सोशल मीडियावर हे गाणं लिहितानाचा अनुभव शेअर केलाय.
छावाचं गाणं लिहितानाचा मराठी लेखकाचा अनुभव
मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने 'छावा' सिनेमातील 'आया रे तुफान' गाणं लिहिलंय. क्षितीजने त्याच्या भावना सोशल मीडियावर शेअर करुन सांगितलंय की, "'छावा' च्या 'आया रे तूफान'च्या निमित्ताने... आयुष्यात कृतकृत्य झाल्याचा अनुभव मला "माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं" गाण्याला मिळत असलेल्या प्रेमानं येत असतानाच, छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणार गाणं लिहायची जबाबदारी आली आणि वाटलं आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला दोन्ही राजांची शब्दरूपी सेवा करता आली."
"ए. आर. रहमान सर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर, निर्माते दिनेश विजन सर, हे गाणं ज्यांच्या सोबत लिहायचं भाग्य लाभलं ते इर्शाद कामिल सर, या सगळ्यांचा आजन्म ऋणी आहे. आपली लाडकी गायिका वैशाली सामंत हिने हे गाणं गायलं आहे. 'छावा' मराठी मातीने देशाला दिलेली आणखी एक अनमोल देणगी ठरावी, ह्या सदिच्छेसह गाणं सादर करतोय "आया रे तूफान !" "भगवे कि शान में चमका आसमान, आया आया आया रे तूफान! एक आंख में पानी, एक में अरमान, आया आया आया रे तूफान!" क्षितिज पटवर्धनने गेल्या वर्षी २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'सिंघम अगेन'च्या पटकथेची जबाबदारीही सांभाळली होती. एकूणच क्षितीज गीतकार आणि पटकथाकार म्हणून मराठीसोबत बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख मिळवतोय.