AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:44 AM2024-05-09T11:44:59+5:302024-05-09T11:47:10+5:30
दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी 'लक्ष्या' या आपल्या प्रिय मित्राला पुन्हा पडद्यावर आणणार असं बोलूनही दाखवलं आहे. यावर लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डेने स्पष्ट मत मांडलं आहे.
सध्या AI या नवीन तंत्रज्ञानाचा मनोरंजनसृष्टीतही शिरकाव झाला आहे. जे कलाकार आता हयात नाहीत त्यांना AI च्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर आणण्याचा प्रयोग येत्या काही काळात होऊ शकतो. या कलाकारांमधलंच एक नाव आहे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी 'लक्ष्या' या आपल्या प्रिय मित्राला पुन्हा पडद्यावर आणणार असं बोलूनही दाखवलं आहे. यावर लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डेने (Abhinay Berde) स्पष्ट मत मांडलं आहे.
अभिनय बेर्डे सध्या 'आज्जी बाई जोरात' नाटकामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो निर्मिती सावंत यांच्यासोबत काम करत आहे. नाटकाची अनाऊंसमेंट AI चा वापर करुन लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजातून करण्यात आली आहे. त्यामुळे या नाटकाची चर्चा आहे. मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच AI चा प्रयोग झाला आहे. मात्र सर्वांच्या लाडक्या लक्ष्यालाच AI च्या मदतीने पडद्यावर आणण्यावर त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने स्पष्ट मत व्यक्त केलंय.
'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "ते कलाकृतीवर, कशाप्रकारे त्यांना आणण्यात येणारे यावर निर्भर करतं. AI त्यांची इमेज आणू शकतं, त्यांचा आवाज आणू शकतं पण त्यांचं टायमिंग आणू शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डेंचा खरोखर अनुभव देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला त्यांचे जुने चित्रपटच पाहावे लागतील. त्यामुळे ते कशाप्रकारे आणलं जातं, कशाप्रकारे वापरलं जातं यावर गोष्टी निर्भर आहेत."
तो पुढे म्हणाला, "पुढच्या १० वर्षात आपल्याला कळेल की AI आपण कुठपर्यंत वापरु शकतो. किती त्याच्या मर्यादा आहेत. AI तुमच्या बुद्धिमत्तेला पर्याय नाहीए, ते केवळ एक साधन आहे. AI तुमच्यासाठी आहे तुम्ही त्याच्यासाठी नाही आहात."