अभिनेता आस्ताद काळेनं सोडलं 'कलावंत पथक', म्हणाला - "माझा काहीही..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 02:25 PM2024-07-23T14:25:57+5:302024-07-23T14:26:31+5:30
Astad Kale : २०१४ पासून दरवर्षी गणोशोत्सवात हे पथक आपली कला सादर करतात. सौरभ गोखले, अनुजा साठे, आस्ताद काळे, श्रुती मराठे या कलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केली. पण या पथकातून आता अभिनेता आस्ताद काळे बाहेर पडला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष पाहायला मिळतो. पुण्यातील मानाच्या गणपतीची मिरवणूक हा पुणेकरांसाठी एक खास सोहळा मानला जातो. या सोहळ्यात सहभागी होणारे कलावंत ढोलताशा पथक पाहण्यासाठी गर्दी केली जाते. त्यामुळे कलावंत ढोल ताशा पथक हे पुणेकरांचे एक खास आकर्षण ठरले आहे. २०१४ साली या ढोलताशा पथकाची स्थापना करण्यात आली. सौरभ गोखले, अनुजा साठे, आस्ताद काळे, श्रुती मराठे या कलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केली. मात्र आता या पथकातून एक मुख्य कलाकार बाहेर पडला आहे. याबद्दल खुद्द त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
२०१४ पासून दरवर्षी गणोशोत्सवात हे पथक आपली कला सादर करतात. या पथकामध्ये सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, अजय पूरकर असे अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळाले आहेत. पण या पथकातून आता अभिनेता आस्ताद काळे बाहेर पडला आहे. त्यानेच पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तो बाहेर का पडला, याबद्दल समजू शकलेलं नाही.
आस्ताद काळेनं फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले की, नमस्कार. मी "कलावंत पथक" सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करू नये. धन्यवाद. आस्ताद काळे त्याच्या या पोस्टमधून कुठेतरी नाराज असलेला पाहायला मिळतो आहे. तडकाफडकी पथक सोडण्यामागचे नेमके कारण काय असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.