"ही माझ्यासाठी धोक्याची घंटा होती...", अतुल परचुरे यांनी अशी दिली कॅन्सरशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 09:30 AM2023-07-15T09:30:33+5:302023-07-15T09:41:27+5:30
अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत आपल्याला झालेल्या कॅन्सरवर सविस्तरपणे भाष्य केलं.
अतुल परचुरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या परचुरेंनी अनेक मालिका व चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. गेल्या काही दिवसांपासून ते मराठी चित्रपटसृष्टी फारसे सक्रिय नाहीत. आता या मागचं मोठं कारण समोर आलं आहे. अतुल परचुरे यांना कॅन्सर झाला होता. एका मुलाखीतमध्ये त्यांनी याचा खुलासा केला.
काही दिवसांपूर्वी अभिनेते अतुल परचुरे यांनी सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर केले होते. ते फोटो पाहून अनेकांना त्यांना ओळखणे कठीण झाले होते. आता एका मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या आजाराबाबत सांगितलं. सगळं व्यवस्थितीत सुरू असताना अचानक एक दिवस कॅन्सरचं निदान झालं. पण इच्छाशक्तीच्या जोरावर ते यातून बाहेर पडले.
हा आजारा काही आपल्याला होणार नाही असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असते. मी कॅन्सरबद्दल खूप ऐकलं होतं वाचलं होतं. माझ्या लग्नाला २०२०मध्ये २५ वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी कोरोना होता म्हणून आम्हाला कुठे जातं आलं नाही. त्यामुळे २०२२ साली मी सोनिया आणि आमची मुलगी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला जाणार होतो.२० ऑक्टोबर २०२२ला आम्ही निघालो. त्यावेळी माझी तब्येत एकदम ठणठणीत होती. तिसऱ्या किंवा चौथ्यादिवशी मला असं जाणवलं कि मला खावेसे वाटत नाहीय. ही माझ्यासाठी धोक्याची घंटा वाटत होती.
पण चुलत भाऊ डॉक्टर असल्याने त्याने प्रवासामुळे असं झालं असावं असा अंदाज बांधला. पुढे न्यूझीलंडमध्ये गेल्यावर काविळ झाल्याचा त्यांना संशय आला.. पण मला बाकीचा त्रास होत नव्हता. थकवा वैगेरे काही वाटत नव्हता. मी गाडी चालवत होतो. चालत होतो. पण फक्त काही खावसं वाटत नव्हतं. भारतात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरकडे गेलो.
माझा एक मित्र डॉक्टर मित्राने मला अस्ट्रा सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. माझा मित्रच सोनोग्राफी करत होता. त्यामुळं त्याचे बदललेले हावभाव मला समजत होते. तो घाबरलेला मला दिसला. त्यामुळं काही तरी गंभीर असल्याचा अंदाज आला होता. त्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले. त्यांनी लिव्हरमध्ये ट्युमर झाल्याचं सांगितलं. घरी आल्यावर सगळ्यात पहिलं आईला सांगितलं. तेव्हा आई म्हणाली की, काही होणार नाही तुला.
२९ डिसेंबर रोजी पहिली ट्रीटमेंट झाली. पण चुकीच्या ट्रीटमेंटमुळं खरं तर तब्येत आणखी बिघडली होती. ट्युमर राहिला बाजूला आणि पॅनक्रीटिटीस झाला.. यामुळे पोट खूप सुजलं होतं खाल्लं की ढेकर यायचे. दीड महिना डॉक्टरांनी थांबायला सांगितलं. त्यानंतर आम्ही ठरवलं की सेकंड ओपिनियन घ्यायचं. त्यानंतर आणखी दोन तीन डॉक्टरांचे सल्ले घेतले आणि त्यानंतर आयुष्यच बदलल्याचं परचुरे यांनी या मुलाखतीत सांगितलंय. सगळ्या प्रवासात संजय नार्वेकर आणि विनय येडेकर हे सावलीसारखे माझ्या बरोबर होते. आज माझ्या मित्रांनी मला प्रचंड साथ दिली.