अभिनेता भरत जाधवनं मुंबईला केला रामराम, या ठिकाणी झाला स्थायिक; यामागचं मोठं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:00 PM2023-05-06T12:00:19+5:302023-05-06T12:00:47+5:30
काही महिन्यांपूर्वी भरत जाधव कुटुंबांसह मुंबईबाहेर स्थायिक झाला. आता मुंबई सोडण्याचा निर्णय का त्याने घेतला याचे कारण समोर आले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्य आणि विनोदाचे अचूक टायमिंग साधून अभिनेता भरत जाधव(Bharat Jadhav)ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जत्रा, खबरदार, पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या आहेत. त्याचा फॅन फॉलोव्हिंग खूप मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे की, काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबांसह मुंबईबाहेर स्थायिक झाला. आता मुंबई सोडण्याचा निर्णय का त्याने घेतला याचे कारण समोर आले आहे.
हो, तुम्ही ऐकलंय ते खरंय. भरत जाधव मुंबईबाहेर स्थायिक झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला राहतो आहे. त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत होता, त्याच्या नाटकाचे प्रयोगही हाऊसफुल होते. मग अशातच त्याने कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. आता हा निर्णय घेण्यामागे काय कारण आहे, यामागचा खुलासा त्याने केला आहे.
वेगाशी जुळवून घेणं आहे कठीण
भरत जाधवने महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मुंबई हे शहर आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी मी जुळवून घेणे मला कठीण वाटते. त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. मात्र आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले.
धावपळ माझ्या वयाला झेपणार नाही
पुढे त्याने सांगितले की, या सगळ्यासाठी करावी लागणारी धावपळ आता माझ्या वयाला झेपणारी नाही हे मला जाणवले आहे. त्यामुळे पैसे तर कमवायचे पण खर्च कमी करायचा असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.