"सिग्नलला थांबलेलं असताना ही कधी कधी..", चिन्मय मांडलेकरची 'ती' पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:40 PM2023-08-08T13:40:50+5:302023-08-08T13:45:38+5:30
चिन्मय पुणे शहरातील ट्रॅफिकमध्ये सोमवारी अडकला होता.
फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चार चित्रपटानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'सुभेदार’ हा सिनेमा येत्या १८ ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अंगावर शहारे आणणऱ्या या ट्रेलरने सिनेमाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आधी लगीन कोंढाण्याचं अन् मंग रायबाचं' असं म्हणत सुभेदार तानाजी मालुसरे शिवरायांना आश्वासन देतात. सिनेमात तानाजी मालुसरे यांची शौर्यकथा बघायला मिळणार आहे. या चित्रपटातही अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) छत्रपती शिवरायांची भूमिका जिवंत करणार आहे. याआधी फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड, शेर शिवराज या चारही चित्रपटात चिन्मयनेच महाराजांची भूमिका जिवंत केली होती आणि त्याने साकारलेल्या या भूमिकेचं प्रेक्षक, समीक्षक सर्वांनीच मनापासून कौतुक केलं होतं.
चिन्मय हा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. 'सुभेदार’चा ट्रेलर पुण्यात प्रदर्शित करण्यात आला यानिमित्ताने संपूर्ण टीम काल सोमवारी पुण्यात होती. चिन्मयने पुणे शहरात ट्रॅफिकमध्ये अडलेला असताना, त्याला बाहेरील फलकावर लावलेला काही मजकूर दिसला जो त्याच्या मनाला भावला.
चिन्मय मांडलेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय, ज्यात त्याने मराठी भाषेतील सकारात्मकता आणि इंग्रजी भाषेतील नकारात्मकता यातील फरक दाखवून दिलाय. या फलकावर पुलंचं एक वाक्य लिहिण्यात आलं होत. "मराठीला जी "मज्जासंस्था" वाटते, तीच इंग्रजीला "नर्वस सिस्टम"वाटते, फक्त दृष्टीकोनाचा फरक आहे-पुं.ल.देशपांडे."
हा फोटो शेअर करताना चिन्मयनं लिहिले, पुणे शहर, सिग्नलला थांबलेलं असताना ही कधी कधी शिकवण देतं!' चिन्मयच्या या पोस्टवर चाहत्यांनी ही कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, ''माय मराठीची गोडीच अमूल्य आहे.. जगतो मराठी जपतो मराठी...'' दुसऱ्याने लिहिले, ''पु.ल. जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहेत.'' आणखी एकाने लिहिले, ''शब्दांचा जादूगार पु.ल.भाई.''