हिंदी वेब सिरीजच्या दुनियेत मराठी अभिनेत्रींचा सुपरहिट शो!
By संजय घावरे | Published: May 30, 2024 08:32 PM2024-05-30T20:32:42+5:302024-05-30T20:34:03+5:30
Gunaah : गश्मीर महाजनीसोबत अभिनेत्रींचा सुपरहिट शो ३ जूनला प्रदर्शित होणार आहे
मुंबई : आज सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या वेब सिरीजचा विस्तार हळूहळू खूपच वाढत आहे. हिंदी वेब सिरीजच्या विश्वात मराठी कलाकारांनी अपार लोकप्रियता मिळवत आपला दबदबा निर्माण केला आहे, पण मराठी अभिनेत्रींचा शो खऱ्या अर्थाने 'सुपरहिट' ठरत आहे.
मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची हिंदी वेब सिरीज 'गुनाह' लवकरच प्रसारीत होणार आहे. यात त्याच्या जोडीला सुरभी ज्योती आहे. गश्मीरखेरीज अमेय वाघ, संदीप कुलकर्णी, नंदू माधव, जितेंद्र जोशी आदी मराठी अभिनेत्यांनी हिंदी वेब सिरीजच्या विश्वात लक्षवेधी कामगिरी केली आहे, पण मुख्य तसेच सहाय्यक भूमिकांमध्ये श्रीया पिळगांवकर, प्रिया बापट, राजश्री देशपांडे, शर्मिष्ठा राऊत, गीतांजली कुलकर्णी, अमृता खानविलकर आदी अभिनेत्रींनी आपला वेगळा ठसा उमटवत लक्ष वेधले आहे.
बहुचर्चित 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दोन्ही पर्वात प्रिया बापटने साकारलेल्या पूर्णिमा गायकवाडचे खूप कौतुक झाले. यात अतुल कुलकर्णीने साकारलेला राजकारणी पिता आणि पूर्णिमाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली. मागच्या वर्षी प्रियाची मनीष पॉलसोबत 'रफूचक्कर' आली होती. आता ती 'अंधेरा' या आगामी वेब सिरीजमुळे लाईमलाईटमध्ये आहे. याखेरीज 'रात जवान है' या वेब सिरीजबाबतही कुतूहल आहे. 'क्रॅकडाऊन', 'गिल्टी माईंड्स', 'द गॉन गेम' अशा गाजलेल्या वेब मालिकांमध्ये श्रीया पिळगावकरने साकारलेल्या व्यक्तिरेखांचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले आहे. नुकताच श्रीयाच्या 'द ब्रोकन न्यूज'चा दुसरा सीझनही रिलीज झाला असून, त्याचेही कौतुक होत आहे. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, मल्याळम, उर्दू भाषांमधील कलाकृतींमध्ये दिसलेल्या राजश्री देशपांडेची 'रंगीन' ही वेब सिरीजही चर्चेत आहे. राजश्रीने 'सॅक्रेड गेम्स' आणि 'द फेम गेम' या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांनीही प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. अमृता खानविलकरची 'लुटेरे' याच महिन्यात रिलीज झाली आहे. यात विवेक गोम्बर आणि रजत कपूरसारखे दिग्गज कलावंत आहेत. याखेरीज अमृताची विशाल फुरिया दिग्दर्शित '३६ डेज' वेब सिरीज रिलीजसाठी सज्ज आहे. यात नेहा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. गीतांजली कुलकर्णीची 'गुल्लक' आणि 'मून वॉक' या वेब सिरीजचीही खूप चर्चा रंगली. काही दिवसांपूर्वीच गीतांजलीची 'लंपन' ही मराठी वेब सिरीजही रिलीज झाली आहे. स्वप्नील जोशीसोबत चित्रपट निर्मिती करत 'नाच गं घुमा' बनवणाऱ्या शर्मिष्ठा राऊतची 'रायसिंघानी वर्सेस रायसिंघानी'ने लक्ष वेधले.