फिल्मफेअर मिळाल्यानंतर अभिनेता जितेंद्र जोशीची खास पोस्ट, म्हणाला - 'नागराज मंजुळेंनी मला...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 09:49 AM2024-04-21T09:49:00+5:302024-04-21T09:49:46+5:30
अभिनेता जितेंद्र जोशीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मराठी कलाविश्वात मानाचा समजला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे हा फिल्मफेअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. 'फिल्मफेअर मराठी २०२४' या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'नाळ २' चित्रपटालाही अनेक पुरस्काराने सन्मानित केलं आहे. 'नाळ २' सिनेमात महत्त्वाची भुमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र जोशीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
'नाळ २' सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) , सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकारने सन्मानित करण्यात आलं. फिल्मफेअर मिळाल्यानंतर जितेंद्र जोशीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, 'काल नाळ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याच विभागात माझा जुना मित्र संदीप पाठक सुद्धा "श्यामची आई" या त्याच्या चित्रपटासाठी मानांकित होता. त्याच्या सोबत हा पुरस्कार वाटून घेतला. नाळ ला सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट ( समीक्षक पसंती) पुरस्कार मिळाले'.
पुढे त्यानं लिहलं, 'माझे घनिष्ट मित्र नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांनी मला ही भूमिका दिली आणि माझे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी प्रेमाने ती करवून घेतली. त्यांच्यातील शांतता घेऊन मी फक्त वावरलो आणि जे घडलं त्याला प्रेम मिळतंय. फिल्मफेअर आणि जितेश पिल्लई सर तुमच्या प्रेमासाठी आभारी आहे. अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर तुम्ही नेहमी प्रमाणे कमाल सूत्रसंचालन केलं. वैश्विक शक्ती चे आभार.. पृथ्वीमातेचे आभार..'. जितेंद्र या पोस्टवर सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या असून शुभेच्छा दिल्या आहेत.
‘नाळ’ चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं होतं. तर दुसरा भाग हा १० नोव्हेंबर २०२३ ला रीलिज झाला. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी हे कलाकार आहेत. हा सिनेमा झी ५ (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.