"मराठी भाषिकांनीच जर मराठी चित्रपट बघितले नाहीतर...", अभिनेते मनोज जोशी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:03 IST2025-04-08T12:57:42+5:302025-04-08T13:03:48+5:30
अभिनेते मनोज जोशी यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

"मराठी भाषिकांनीच जर मराठी चित्रपट बघितले नाहीतर...", अभिनेते मनोज जोशी स्पष्टच बोलले
Manoj Joshi: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. याबरोबरच टेलिव्हिजन, नाटक अन् चित्रपट या तीनही माध्यमात काम करण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. लवकरच ते दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या भेटीला येत आहेत. येत्या १८ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याचनिमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
नुकताच मनोज जोशी यांनी 'प्लॅनेट मराठी'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान बोलताना ते म्हणाले, "प्रत्येक मराठी माणसाने ज्याला मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आणि मराठी संत परंपरेचा अभिमान आहे अभिमान आहे त्यांनी 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघावा. कारण मी नेहमी सांगतो, आपण मराठी भाषिकांनीच जर मराठी चित्रपट बघितले नाही तर अशा प्रकारचे चित्रपट कोण आणि कशासाठी बनवणार हा विचार करावा."
यापुढे मनोज जोशी म्हणाले, "हिंदी चित्रपट बघण्याला मनाई नाही आहे. मी सुद्धा हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय पण मनाला समाधान मिळावं आणि एक आत्मिक समाधान मिळावं म्हणून मी मराठी चित्रपटात काम करतो. मला ते आवडतं. शिवाय मला अभिमान आहे की मी या चित्रपटाचा एक भाग आहे." असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.