Ramesh Deo : शाहू महाराज म्हणाले आजपासून तुम्ही ‘देव’, अन् रमेश देवांचं आडनाव बदललं!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 10:32 AM2022-02-03T10:32:12+5:302022-02-03T10:32:53+5:30
Ramesh Deo : रमेश देव यांना ‘देव’ हे आडनाव राजश्री शाहू महाराजांनी दिलं होतं...; वाचा, ‘देव’या आडनावामागचा किस्सा
मराठी व हिंदीचित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo ) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. पाचच दिवसांपूर्वी (30 जानेवारी) त्यांनी 93 वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांच्या पूर्वजांची नाळ जोधपूर राजस्थानशी जुळलेली होती. रमेश देव यांचे वडील राजश्री शाहू महाराज यांच्या दरबारात फौजदारी वकील होते. विशेष म्हणजे, रमेश देव यांच्या आजोबा व पणजोबांनी जोधपूर पॅलेसपासून कोल्हापूर शहर वसवण्यात योगदान दिलं होतं.
जोधपुरातून रमेश देव यांचे पूर्वज कोल्हापुरात स्थायिक झालेत. त्यांचे आजोबा व पणजोबा पेशाने इंजिनिअर होते. रिपोर्टनुसार, छत्रपति शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूर शहर वसवण्यासाठी खास बोलावलं होतं. रमेश देव यांचे आजोबा चीफ इंजिनिअर या नात्याने शाहू महाराजांकडेआले होते. तर रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांच्या दरबारात फौजदारी वकील होते.
रमेश देव यांचे आडनाव खरं तर ठाकूर होतं. राजश्री शाहू महाराज यांच्यामुळे देव घराण्याचं आडनाव बदललं. रमेश देव यांचे वडील त्या काळचे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. शाहू महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच ते वकील झाले होते. एकदा रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना एका कामात मदत केली. तेव्हा शाहू महाराज म्हणाले, ‘ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात बघा. तुम्ही आता ठाकूर नाही आजपासून तुम्ही देवच.’ रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचा एकही शब्द खाली पडू देत नसत. मग हा तर कसा पडू देणार ? त्यामुळे त्या दिवशीपासून ठाकूर कुटुंबियांचं आडनाव ‘देव’ झालं.