रंगमंच देतो अभिनयाचं बळ - सुबोध भावे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2017 06:32 PM2017-01-07T18:32:46+5:302017-01-07T18:32:46+5:30
अबोली कुलकर्णी ‘लोकमान्य-एक युगपुरूष’,‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’,‘रणभूल’,‘भारतीय’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारलेला एक अष्टपैलू अन् हरहुन्नरी अभिनेता म्हणजे ...
‘लोकमान्य-एक युगपुरूष’,‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’,‘रणभूल’,‘भारतीय’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारलेला एक अष्टपैलू अन् हरहुन्नरी अभिनेता म्हणजे सुबोध भावे. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ आणि ठामपणे स्त्रीभूमिका साकारणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणून सुबोधचा उल्लेख करण्यात येतो. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर तो आगामी मराठी चित्रपट ‘करार’ मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. चित्रपटाच्या निमित्ताने त्याने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्याच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टी, त्याचा प्रवास, आवडीनिवडी याबद्दल गप्पाटप्पांचा तास रंगला....
* ‘करार’ या मराठी चित्रपटातील तुझ्या व्यक्तीरेखेविषयी काय सांगशील?
- करार हा एक कौटुंबिक चित्रपट असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजच्या धावत्या जगात बदलत चाललेल्या मातृत्वाबाद्दलच्या मानसिकतेवर आधारित हा चित्रपट आहे. यात मी सुनील मोकाशी या इन्शुरन्स एजंटची व्यक्तीरेखा साकारतोय. सुनील हा अत्यंत हिशोबी व्यक्ती असतो. दैनंदिन आयुष्य, नातेसंबंध यांच्यामध्येही व्यवहार आणण्याचा त्याचा स्वभाव असतो. पती-पत्नीतील वाद-संवाद, नात्यांमधील संघर्ष यात पाहायला मिळेल. उर्मिला कानेटकर हिने माझी पत्नी (जयश्री) हिची भूमिका केली आहे. क्रांती रेडकर हिने उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. चित्रपट १३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला लावणारी ही कथा आहे.
बालगंधर्वमधील सुबोध भावे
* कलाकारासाठी रंगमंच किती महत्त्वाचा असतो?
- कलाकाराचे मायबाप म्हणजे रंगमंच. प्रत्येक कलाकाराची सुरूवातच रंगभूमीवरून होत असते. ज्या रंगमंचाने आपल्याला प्रसिद्धी दिली, अभिनयासाठी बळ दिले त्या रंगमंचाला खरंतर कलाकार कधीच विसरू शकत नाहीत. आयुष्यात तुम्ही कुठल्याही स्टेजला जा, पण ज्या स्टेजमुळे तुम्ही उभे आहात त्या स्टेजचे स्मरण आणि नमन करायला विसरू नका. कलाकार म्हणून मी देखील रंगमंचावर तुफान प्रेम केलं.
अभिनेत्री अमृता सुभाषसोबत सुबोध भावे
* कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायला तुला जास्त आवडतं?
चित्रपटामध्ये आपला सहकलाकार कोण आहे यावर त्या चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री यांची केमिस्ट्री अवलंबून असते. कलाकारांनी एकमेकांसोबत काम करताना कम्फर्टेबल असणं गरजेचं असतं. मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. मात्र, अभिनेत्री अमृता सुभाष हिच्यासोबत मला काम करायला प्रचंड आवडतं. ती माझी चांगली मैत्रीण आहे. तिच्यासोबत काम करतानाचा अनुभव हा नेहमीच शिकण्यासारखा असतो. तसेच क्रांती ही देखील माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्यासोबत काम करणं मी एन्जॉय करतो.
१६ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले विजेते दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णनसोबत सुबोध भावे.
* तुझ्यासाठी अभिमानाची बाब कोणती?
एखाद्या बडया दिग्दर्शकासोबत आपल्याला काम करायला मिळावं असं कुठल्या कलाकाराला वाटत नाही? एका मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची माझी इच्छा होती. तशी संधीही मला मिळाली. १६ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले विजेते दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन हे भारतातील समांतर चित्रपटाचा पाया रचणाऱ्यापैकी एक. मला त्यांच्यासोबत ‘पिन्नेयम’ या रोमँटिक मल्याळी चित्रपटासाठी काम करायला मिळालं. त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे.
* तुझे आगामी प्रोजेक्टस् काय आहेत?
- मराठी माझी माय..माझ्या अस्तित्वाशी संबंध जोडणारी भाषा. मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम. कामाला सुरूवात केली ती मराठीतूनच. त्यामुळे मला मराठीसोबतच इतर भाषांमध्ये काम करायलाही प्रचंड आवडतं. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली यांसारख्या अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर आता मी इतर भाषांमधील चित्रपटांवर लक्ष केंद्रित करतोय. मराठीसोबतच मला इतर भाषांमध्येही माझ्या अभिनयाचा झेंडा रोवण्याची प्रचंड इच्छा आहे.