अभिनेता सिद्धार्थ जाधवने महामानवाला केले अभिवादन, पहा त्याचा हा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 11:48 AM2020-04-14T11:48:19+5:302020-04-14T11:49:05+5:30
सिद्धार्थ जाधवने महामानवाला अभिवादन केले आहे. तसेच चाहत्यांना घरी राहूनच जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
दरवर्षी १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती जल्लोषात साजरी होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं एकत्र जमत असतात. मात्र यंदा तसं न करता आपण घरुनच बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करावे असं आवाहन अभिनेता सिद्धार्थ जाधवने केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन केले आहे. तसेच चाहत्यांना घरी राहूनच जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
सिद्धार्थ जाधवने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून त्यात म्हटलंय की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, प.पू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.. आपण घरी राहूनच त्यांची जयंती घरीच साजरी करू आणि कायदा पाळू.. या कठीण प्रसंगी हीच खरी त्यांना आदरांजली असेल.. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत..
अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर सक्रीय असून तो नेहमी फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या लॉकडाउनमध्ये सिद्धार्थ घरी असून तो सातत्याने कोरोना व्हायरसच्याबाबतीत जनजागृती करणारे व्हिडिओ शेअर करत असतो.
सिद्धार्थच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर त्याने आतापर्यंत मराठी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. शेवटचा तो धुरळा या सिनेमात झळकला होता.
तसेच त्याने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. तो सिंबा या हिंदी चित्रपटात दिसला होता. त्यातील त्याचे काम प्रेक्षकांना चांगलेच भावले होते.