'अजिंक्य योद्धा'मध्ये बाजीराव पेशव्यांच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 06:16 PM2019-01-08T18:16:24+5:302019-01-08T18:19:01+5:30
'अजिंक्य योद्धा - श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ' हे एक भव्य महानाट्य लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे.
उत्कृष्ट शासक, युद्धनीती, शस्त्रविद्या, कुशाग्र बुद्धी, चपळाई या गुणांचा योग्य वापर करून आपलं साम्राज्य सर्वदूर पोहोचवणारा एक अजेय योद्धा... परकीय महासत्तांवर मात करून ज्यांनी थेट दिल्लीवर भगवा फडकावला, ते बाजीराव पेशवे... त्यांचे जीवन, कारकीर्द, कर्तृत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'अजिंक्य योद्धा - श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ' हे एक भव्य महानाट्य लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार असून संजय पांडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या महानाटकाची निर्मिती पंजाब टॉकीजने केली आहे. या महानाटकाचा भव्य शुभारंभ १८ व १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अंधेरीतील होली फॅमिली स्कूलमधील पटांगणात होणार आहे.
'अजिंक्य योद्धा - श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ' या महानाट्याची निर्मिती करताना कोणतीही तडजोड न करता खरा इतिहास प्रेक्षकांसमोर सादर व्हावा, या हेतूने दिग्दर्शक वरुणा मदनलाल राणा आणि लेखक प्रताप गंगावणे यांनी दोन वर्षं सातत्याने या नाटकाच्या संहितेवर काम केले आहे. या महानाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी भव्य रंगमंच उभारण्यात येणार असून त्याची लांबी, रुंदी १०० फूट इतकी भव्य आहे. दृश्यांना पूरक असे नेपथ्य आहे. या भव्य दिव्य नेपथ्याचे कलादिग्दर्शन आबीद शेख यांनी केले आहे. घोड्यांचा वापर, भरजरी पेहराव, दागदागिने याव्यतिरिक्त मुख्य पात्रांसह १३० कलाकारांचा या महानाट्यात सहभाग आहे. यावरूनच डोळे दिपवून टाकणाऱ्या या नाटकाची भव्यता लक्षात येते.
बाजीरावांचा इतिहास उलगडणाऱ्या या नाटकाच्या कार्यकारी निर्मात्याची व सहाय्यक दिग्दर्शनाही धुरा अभय सोडये यांनी सांभाळली असून योगेश मोरे, कृणाल मुळये, रुपेश परब सहाय्यक आहेत. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन आदी रामचंद्र यांचे असून आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, वैशाली माडे, आदी रामचंद्र यांच्या आवाजात ही गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. पार्श्वसंगीत व संगीत संयोजन विनीत देशपांडे यांचे असून नरेंद्र पंडित यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. नाटकाच्या प्रकाशयोजनेची जबाबदारी भूषण देसाई यांनी सांभाळली आहे. तर वेशभूषा पूर्णिमा ओक यांची आहे.