'अशी ही बनवाबनवी'मधल्या लिंबू कलरच्या साडीमागचं गुपित अश्विनी भावेंनी उलगडलं, म्हणाल्या- "अशोकमुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 04:04 PM2024-07-31T16:04:00+5:302024-07-31T16:04:19+5:30
'अशी ही बनवाबनवी'मधला लिंबू कलर आणि त्यामागचं गुपित अश्विनी भावेंनी सांगितलं. काय म्हणाल्या बघा (ashwini bhave, ashi hi banwa banwi)
अभिनेत्री अश्विनी भावे या गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. अश्विनी यांनी कारकीर्दीत अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अश्विनी यांची भूमिका असलेला एक सिनेमा आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या सिनेमाचं नाव 'अशी ही बनवाबनवी'. या सिनेमात अश्विनी यांनी माधुरी मॅडमची भूमिका साकारली. माधुरी मॅडम, धनंजय माने आणि लिंबू कलर या गोष्टी आजही प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ आहेत. या सिनेमाविषयी अश्विनी भावे यांनी त्यांचं मत मांडलंय.
लिंबू कलर अशोकमुळे लोकप्रिय झाला: अश्विनी भावे
या सिनेमाविषयी अश्विनी भावेंनी त्यांच्या मनातल्या भावना शेअर केल्या. रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "या चित्रपटामध्ये तीन पिढ्यांना सातत्याने एंटरटेन करण्याची ताकद आहे. असा योग जुळून येणं, अशी भट्टी जमणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. माझी व्यक्तिरेखा आणि लिंबू कलर फक्त अशोक सराफमुळे लोकप्रिय झालाय. म्हणजे मला नाही वाटत की मी त्या पेसने ते डायलॉगसुद्धा आता बोलू शकेल. काय होतं ना... या चित्रपटामध्ये बघशील तर माझी भूमिका एवढीशी आहे."
कधीकधी अवघडल्यासारखं वाटतं कारण...: अश्विनी भावे
अश्विनी भावे पुढे म्हणाल्या, "या चित्रपटात चार मुख्य नायिका त्यातली मी एक. याशिवाय सचिन आणि लक्ष्या यांनीही स्त्रीपात्र केली आहेत. आणि सचिन सगळ्यात सुंदर स्त्री पात्र आहे त्या सिनेमातलं. म्हणजे आम्ही त्याच्यासोबत स्पर्धाच करु शकत नाही. तर असं असताना माझ्या वाट्याला किती क्षण यावेत. मला कधीकधी इतकं प्रेम स्वीकारायला खूप अवघडल्यासारखं वाटतं. हे बनवताना असं ठरवून बनवलेलं नव्हतं. पण ते होणार होतं अन् ते झालं." अश्विनी भावेंची भूमिका असलेला 'घरत गणपती' सिनेमा २६ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय.