केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर, नेत्याने धमकी दिल्याचा आरोप,स्क्रीनशॉटही केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 06:00 PM2020-07-14T18:00:27+5:302020-07-14T18:08:25+5:30
केतकी चितळेने पुन्हा एक पोस्ट लिहिली असून त्यात तिने शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
स्टॅण्डअप कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर केतकी चितळेनेही सोशल मीडियावर महाराजांचा एकेरी उल्लेख केला. केतकीच्या या पोस्टने शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सध्या केतकीला नेटीझन्स खडेबोल सुनावत जबरदस्त ट्रोल करत आहेत. अशातच केतकी चितळेने पुन्हा एक पोस्ट लिहिली असून त्यात तिने शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
केतकीने म्हटले आहे की, शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नम्बर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे ! तिला आलेले मेसेजचा स्क्रीनशॉटही तिने शेअर केला आहे.
या पोस्टनंतर तिची कानउघाडणी करण्यासाठी अनेकांचे फोन आल्याचे तिने म्हटले आहे. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही फेसबुक पोस्टद्वारे केतकी चितळेवर निशाणा साधला होता. रुपाली पाटील म्हणाल्या होत्या की, केतकी यावेळी तू चुकलीस. मागे तुला ट्रोल केले म्हणून आम्ही महिलेला असे ट्रोल करू नये, असं नेटकऱ्यांना सुनावले होते. नावडती केतकी दरवेळेला वादग्रस्त विधान करून लोकांना त्रास देण्याचा काम करते आहे.
माझं तुला मनसे सांगणे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि करोडो मावळ्यांचे मनावर ते राज्य करत आहे. त्यामुळे कितीही शिकलेले असू द्या, आपली सद्सद्द्विवेक बुद्धी जागी ठेवली नाही तर त्या उच्च शिकण्याचा काहीच उपयोग नाही, असं रुपाली पाटील यांनी सांगितले होते.