'घर संसार' चित्रपटातील ही अभिनेत्री आता दिसते अशी, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 07:00 AM2021-06-16T07:00:00+5:302021-06-16T07:00:00+5:30

१९९८ साली 'घर संसार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

The actress from the movie 'Ghar Sansar' now looks like her husband is also a famous actor | 'घर संसार' चित्रपटातील ही अभिनेत्री आता दिसते अशी, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

'घर संसार' चित्रपटातील ही अभिनेत्री आता दिसते अशी, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

googlenewsNext

१९९८ साली 'घर संसार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. निशिगंधा वाड, दीपक देऊळकर, उदय टिकेकर, रुपाली देसाई, नयना आपटे, सुधीर जोशी या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात उदय टिकेकर यांच्या पत्नीची म्हणजेच सुमनची भूमिका अभिनेत्री रुपाली देसाई यांनी साकारली होती. रुपाली देसाई या मराठी नाटक आणि चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मात्र त्यांनी आता एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.

रुपाली देसाई यांचे लग्नापूर्वीचे नाव आहे रुपाली वैद्य. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे नृत्याचे धडे त्यांनी गिरवले असून त्या प्रोफेशनल कथ्थक विशारद आहेत आणि बीए एल एल बी ची पदवीदेखील मिळवली आहे. प्रसार भारतीतर्फे वर्गीकृत केलेल्या आर्टिस्ट म्हणूनही त्या ओळखल्या जातात तर दिल्ली श्रीनगरमणी अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आला आहे. आज मोठमोठ्या मंचावरून त्या आपल्या नृत्याची कला सादर करताना दिसत आहेत. 


रुपाली देसाई यांनी सुरुवातीला आदेश बांदेकर यांच्यासोबत दूरदर्शनवरील ताक धिना धीन या लोकप्रिय शोचे सूत्रसंचालन केले होते. देव नवरी, असेच आम्ही सारे, श्री तशी सौ, उंच माझा झोका गं, अनोळखी ओळख, झालं एकदाचं अशा बऱ्याच नाटकात त्यांनी काम केले आहे.

रुपाली देसाई यांचा नवरादेखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांचे नाव आहे श्रीकांत देसाई. श्रीकांत देसाई हे गेल्या ३४ वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. नाटक आणि मालिकांमधून त्यांनी सहाय्यक, चरित्र तसेच विरोधी भूमिका साकारल्या आहेत.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून मुघल सरदाराची भूमिका त्यांनी साकारली होती. याशिवाय मोरूची मावशी नाटक, लेक माझी लाडकी सारख्या अनेक मालिकेतून ते कधी वडिलांच्या भूमिकेत तर कधी विरोधी भूमिकेत पाहायला मिळाले. 


रुपाली देसाई यांनी संस्कृती नृत्य कला मंदिर या नावाने स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली आहे. रुपाली आणि श्रीकांत देसाई यांना दिशा ही मुलगी आहे. वयाच्या अडीच वर्षांपासूनच दिशा आपल्या आईकडून नृत्याचे धडे गिरवत होती. पुढे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने विशारद पूर्ण केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात कथ्थक नृत्य मुंबई विभागातून प्रथम क्रमांकाचे तसेच सुवर्णपदक तिला प्रदान करण्यात आले होते. तसेच नृत्य क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या मेनका ट्रॉफीची ती मानकरी ठरली आहे. आज रुपाली देसाई अभिनय क्षेत्रातून गायब असल्या तरी नृत्य क्षेत्रात कार्यरत आहे.

Web Title: The actress from the movie 'Ghar Sansar' now looks like her husband is also a famous actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.