'दहा दिशांच्या ह्रदयामधूनी अरुणोदय झाला...', प्राजक्ता माळीची राम मंदिर सोहळ्यानिमित्त खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:01 AM2024-01-22T11:01:07+5:302024-01-22T11:03:21+5:30
अभिनेत्री प्राजक्ता माळीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसंदर्भात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा आज (२२ जानेवारी २०२४ रोजी) पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. देशातील हा सर्वोच्च सोहळा असणार आहे. देशभरातील नागरिक भारतीय राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही खास पोस्ट केली आहे.
प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर सुर्योदयाचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. तिनं लिहलं, '२२ जानेवारी २०२४. #सुवर्णदिन...शतकांच्या यज्ञातून उठली...एक केशरी ज्वाळा…दहा दिशांच्या ह्रदयामधूनी अरुणोदय झाला…#जयश्रीराम #अयोध्या...सगळं सुंदर, मंगलमय, पावित्र्यपुर्ण असू दे; प्राणप्रतिष्ठा शांततेत पार पडू दे. ही प्रत्येक “भारतीयाची” भावना असू दे. #भारत #प्रभू". तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी "जय श्री राम" अशा कमेंट केल्या आहेत.
राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी, दिग्गज राजकारणी, समाजकारणी हे अयोध्येला पोहचत आहेत. या सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला अनेक राज्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) नेही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय रामायण मालिकेत राम, लक्ष्मण व सीता यांच्या भूमिका साकारणारे अरुण गोविल, सुनील लहरी व दिपिका चिखलियादेखील अयोध्येत या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.
अयोध्येतील ८ एकर जमिनीत हे राम मंदिर उभारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश- विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.