अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास उलगडणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 11:10 AM2022-07-23T11:10:30+5:302022-07-23T11:10:55+5:30

Ranjana Deshmukh : रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

Actress Ranjana Deshmukh's life journey will unfold on the silver screen | अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास उलगडणार रुपेरी पडद्यावर

अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास उलगडणार रुपेरी पडद्यावर

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयाने रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवले आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांचे नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले. अशा चतुरस्त्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

रंजना यांच्या जीवनावर आधारलेल्या 'रंजना - अनफोल्ड' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन - कार्निव्हल ग्रुप हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'रंजना - अनफोल्ड' या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख यांचा प्रवास उलगडण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करून पुढल्या वर्षी ३ मार्च २०२३ रोजी  'रंजना - अनफोल्ड' प्रेक्षकांसमोर सादर करण्याची योजना आखण्यात आली आहे.


मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी १९६० ते २००० पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचे मनोरंजन केले. वयाच्या पाचव्या वर्षीच 'हरिश्चंद्र तारामती' या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून काम करत त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी 'असला नवरा नको गं बाई' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर 'मुंबईचा फौजदार', 'सुशीला', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचुप गुपचुप', 'बहुरूपी', 'बिन कामाचा नवरा', 'खिचडी' अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. आता पुन्हा एकदा त्या बायोपिकच्या रूपात मराठी रसिकांसमोर येणार आहेत.

Web Title: Actress Ranjana Deshmukh's life journey will unfold on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.