ती सध्या शेती करते...! अभिनय सोडून या अभिनेत्रीने कोकणात फुलवले 'आनंदाचे शेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 05:28 PM2021-05-25T17:28:58+5:302021-05-25T17:37:54+5:30
कलाकार ते शेतकरी! पतीने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली अन् तिने अभिनय
वेगळ्या वाटेने जाण्यासाठी आणि सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठी जिगरा लागतो. मराठमोळी अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी (Sampda Joglekar Kulkarni) हिने अशीच हिंमत दाखवली अन् आनंदाचे शेत निर्माण केले. संपदा व तिच्या पतीने शेती आणि ग्रामीण भाग ही मध्यवर्ती संकल्पना राबत कृषी पर्यटनाचा नवा पॅटर्न त्यांनी शोधून काढला आहे.
रत्नागिरीतील फुणगूसमधील त्यांच्या या पॅटर्नचे नाव आहे आनंदाचे शेत. यासाठी तिचा पती राहुलने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली अन् संपदाने अभिनयाला रामराम ठोकला.
संपदाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. उत्तम अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निवेदिकाच्या भूमिकेत तिला अनेकांनी पाहिले असेल. मात्र आता ती शेतीत राबतेय.
संपदा आणि तिच्या पतीनं एक स्वप्न बघितलं होतं. ते म्हणजे चाळीशीनंतर आपआपलं क्षेत्र बदलायचं. संपदाचा पती जाहिरात कंपनीत क्रिएटीव्ह हेड होता तर संपदाचे अभिनयातील करिअर शिखरावर होते. पण दोघांनीही निश्चय केला आणि स्वप्नपूर्तीसाठी करिअर बाजूला ठेवले.
राहुलची वडिलोपार्जित शेती होती. पण शेतीचं काहीही ज्ञान नव्हत. अशात राहुलने विविध शेतीविषयक पुस्तके, गुगल, तज्ज्ञ मंडळी यांच्या सहाय्याने शेतीचं रीतसर ज्ञान आत्मसात केलं.
त्यानंतर आपल्या नोकरीला कायमचा रामराम ठोकून पूर्णपणे स्वत:ला शेतीत झोकून दिलं आणि त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवत, संपदाने सुद्धा शेतीत उतरायचा निर्णय घेतला.
या दोघांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक पिक घेण्यास सुरुवात केली. आंबा, काजू यांसारख्या फळांची लागवड केली. यांचा भाजीपाला आणि फळे थेट मुंबईमध्ये सुद्धा विक्रीसाठी जातात.
या दोघांची मुलगी शर्वरी कुलकर्णी सुद्धा एक अभिनेत्री आहे. तिने ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत काम केलं आहे. ती अलीकडेच विभव बोरकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
काय आहे 'आनंदाचे शेत' ही कल्पना?
डिजीटल युगात मुलं जेव्हा आनंदाचे शेतला भेट देतात तेव्हा मोबाईलपासून दूर नेत त्यांना बैलगाडीची सफर घडवत सगळ्या गोष्टींची माहिती देण्यात येते. आमराईत घर, घरातल्या भाज्या जेवणातल्या ताटात, चुलीवरील जेवण कुणालाही आपल्या गावची आठवण करुन देईल अशा कोकणातल्या विविध भागातील पाककृती इथे जेवणात असतात. याशिवाय मुलांना जेवणातल्या ताटातील तांदुळ कुठून येतो इथपासून माहिती दिली जाते. तांदुळ पेरला की 200 तांदुळ होतात. एक तीळ पेरला की दोन हजार तिळ येतात अशी रंजक माहिती मुलांना दिली जाते.