‘घरातलं कुणी गेलं तर १३ दिवस दुःख पाळतो, मग आता...’; पहलगाम हल्ल्यानंतर सुप्रिया पिळगावकरांनी घेतला मोठा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:40 IST2025-04-24T12:39:55+5:302025-04-24T12:40:09+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी देखील आपला राग व्यक्त करत, एक मोठा निर्णय घेतला आहे.

‘घरातलं कुणी गेलं तर १३ दिवस दुःख पाळतो, मग आता...’; पहलगाम हल्ल्यानंतर सुप्रिया पिळगावकरांनी घेतला मोठा निर्णय!
Supriya Pilgaonkar On Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरून गेला आहे. देशभरातून काश्मीरचं सौंदर्य पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची या हल्ल्यात क्रूर हत्या करण्यात आली आहे. जगभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून प्रत्येकाच्या काळजात चर्र होत आहे. या भ्याड हल्ल्यात अनेक कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत. दरम्यान आता देशवासीय आपला संताप व्यक्त करत या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी देखील आपला राग व्यक्त करत, एक मोठा निर्णय घेतला आहे.
पहलगामच्या घटनेवर अनेक कलाकारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून व्यक्त झाले आहे. अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर, पुढचे १३ दिवस त्या हाताला काळी पट्टी बांधून आपलं दुःख व्यक्त करणार आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया पिळगावकर?
सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “शो मस्ट गो ऑन. मी ही दुःखद बातमी रेडीओवर ऐकली. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर, आपण १३ दिवस दुखवटा पाळतो, शोक व्यक्त करतो. मी आता माझा शोक व्यक्त करणार आहे. मी पुढचे १३ दिवस माझ्या हाताला काळी पट्टी बांधून मला मनातून किती दुःख झालं आहे, हे सांगणार आहे.” यासोबतच त्यांनी सगळ्यांना आवाहन करत पुढे लिहिले की, “तुम्हीही माझ्यासोबत हाताला काळी पट्टी बांधून आपला शोक व्यक्त करू शकता.”
दिखावा म्हणू नका!
“मी यातून दिखावा करतेय असं कृपया म्हणून नका. या कृतीतून मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. यातून मला दुःख व्यक्त करत असल्याची भवना निर्माण होत आहे”, असे सुप्रिया पिळगावकर यांनी म्हटले आहे. यासोबतच सुप्रिया यांनी आपल्या हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधलेला फोटो देखील शेअर केला आहे. सुप्रिया पिळगावकर यांच्याप्रमाणेच आयपीएल क्रिकेट सामन्यात क्रिकेटपटू देखील हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार असून, आपला निषेध आणि शोक व्यक्त करणार आहेत.