'भिमाची पुण्याई…' पंढरपुरात पेट्रोल पंप सुरु केल्यावर आदर्श शिंदेची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 02:16 PM2023-11-19T14:16:24+5:302023-11-19T14:19:15+5:30
आदर्श शिंदे यांनी नव्या पेट्रोलपंपासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मराठी कलाविश्वातील शिंदे फॅमिली हे लोकप्रिय कुटुंब आहे. आनंद शिंदेंची लोकगीते आजही प्रत्येक कार्यक्रमात वाजवली जातात. आदर्श शिंदेनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात नाव कमावलं. दिवाळीच्या मुहुर्तावर शिंदे कुटुंबीयांनी पंढरपुरात पेट्रोल पंप सुरू केला आहे. "आदर्श आनंद शिंदे" असं या पेट्रोल पंपाचं नाव आहे. आता आदर्श शिंदे यांनी नव्या पेट्रोलपंपासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आदर्श यांनी पोस्टमध्ये लिहले, 'भिमाची पुण्याई… “Adarsh Anand Shinde Petroleum”. माझ्या “मम्मीचं” स्वप्नं होतं, ते पूर्ण केलं. आपला पेट्रोल पंप असायला पाहिजे असं तिला खूप वर्ष वाटत होतं आज ते सत्यात घडलं याचा आनंद आहे. एका नवीन विश्वात entry केली आहे, बघुया पुढचा प्रवास कसा होईल'.
पुढे त्याने लिहले, 'माझा मोठा भाऊ “ हर्षद शिंदे” याने आधार दिला नसता, तर हे शक्य झालं नसतं, कारण या उद्योगाला लागणारा वेळ, मनुष्य बळ आणि विश्वास माझ्या भावाकडे नसता तर हे शक्य झालं नसतं. आमच्या गावी “मंगळवेढे” इथे अनेक उद्योग करत असताना भाऊ म्हणाला “तू कर मी आहे”. या एका त्याच्या वाक्यामुळे जे बळ मिळालं ते शब्दात मांडता येणार नाही. तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं करु शकलो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार'.
आदर्श शिंदेची ही पोस्ट चर्चेत असून त्यांना अनेकांनी नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आदर्श शिंदे यांनी मराठी कलाविश्वाला ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, ‘सुन्या सुन्या’, ‘अंबे कृपा करी’ यांसारखी सुपरहिट गाणी दिली आहेत. आदर्श शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात केली होती. आदर्श शिंदे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये गाणी गायली आहेत. शिवाय, त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.