बऱ्याच कालावधीनंतर ही मराठमोळी अभिनेत्री 'सुर्या' चित्रपटातून करतेय कमबॅक, जाणून घ्या तिच्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:53 PM2022-12-26T15:53:56+5:302022-12-26T16:01:30+5:30
२००६च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर तिनं आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा खिताब मिळवला होता.
अभिनेत्री अमृता पत्की हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. २००६च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने २०१०मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली ही गुणी अभिनेत्री आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
सध्या मराठी चित्रपटात बॉलीवूड तारका आयटम साँगवर थिरकताना दिसतायेत. या यादीत अमृताचाही समावेश झाला आहे. अमृता पत्की हिच्या नृत्याचा जलवा ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.
‘रापचिक रापचिक कोळीणबाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात अमृताचा नखरेल अंदाज पहायला मिळणार आहे. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संतोष दरेकर, मंगेश ठाणगे, देव चौहान यांनी लिहिलेल्या गाण्याला देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. ममता शर्मा आणि देव चौहान यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सच्या ‘सुर्या’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट ६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल’ असा विश्वास अमृताने व्यक्त केला.
‘सुर्या’ चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. साहसदृश्ये अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस यांची आहेत. रेश्मा मंगेश ठाणगे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, प्रसाद मंगेश, चेतन मंगेश हे या चित्रटाचे सहनिर्माते आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.