राजामौलींच्या सिनेमात तेजस्विनी पंडितची वर्णी! सयाजी शिंदेही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:34 AM2024-06-23T11:34:32+5:302024-06-23T11:35:05+5:30
सयाजी शिंदे यांनी याआधी अनेक दाक्षिणात्य सिनेमांत काम केलं आहे. तर तेजस्विनीचा हा पहिलाच साऊथ सिनेमा आहे.
एस.एस.राजामौली हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'बाहुबली', 'RRR' यांसारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले. राजामौलींसारख्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर काम करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. काही दिवसांपूर्वीच राजामौलींच्या 'अहो विक्रमार्का' सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात मराठी अभिनेता प्रविण तरडे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रविण तरडेनंतर आता या सिनेमात तेजस्विनी पंडित आणि सयाजी शिंदे यांचीही वर्णी लागली आहे.
'अहो विक्रमार्का' सिनेमात तेजस्विनी पंडित आणि सयाजी शिंदे झळकणार आहेत. सयाजी शिंदे यांनी याआधी अनेक दाक्षिणात्य सिनेमांत काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ते साऊथ सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर तेजस्विनीचा हा पहिलाच साऊथ सिनेमा आहे. राजामौलींच्या सिनेमातून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमात तेजस्विनी आणि सयाजी शिंदे कोणत्या भूमिका साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र राजामौंलीच्या सिनेमात त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
राजामौलींच्या 'अहो विक्रमार्का' सिनेमात अभिनेता देव गिल मुख्य भूमिकेत आहे. तर मराठमोळे प्रविण तरडे खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. एस. एस. राजामौली फिल्म्सचे सहाय्यक दिग्दर्शक त्रिकोटी पेटा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर डॉ. मिहीर कुलकर्णी यांनी निर्मिती केली आहे. तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगालीसह मराठी अशा एकूण ७ भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. लवकरच 'अहो विक्रमार्का' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.