'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:37 AM2024-10-10T10:37:52+5:302024-10-10T10:38:58+5:30

भारतीय उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले (ratan tata)

After Ratan Tata death marathi writer director kshitij patwardhan post viral | 'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झालं. रतन टाटा यांच्या निधनाने भारतातील सामान्य नागरिकांपासून ते दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. भारताला आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी रतन टाटा कायमच प्रयत्नशील राहिले. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाची मोठी हानी झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. अशातच मराठमोळा लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने रतन टाटा यांच्याबद्दल मोजक्या पण महत्वाच्या शब्दात त्याच्या भावना व्यक्त केल्यात.

क्षितीजची रतन टाटांना आदरांजली

क्षितीज पटवर्धनने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "रतन टाटा सर. ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली. फक्त मालाची विक्री नाही, मूल्यांची बांधणी केली. पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली, फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला कीर्ती दिली. तुमच्या वैचारिक श्रीमंतीला,आणि भौतिक साधेपणाला, तेजःपुंज व्यक्तिमत्वाला, आणि लखलखीत कारकिर्दीला... विनम्र अभिवादन" अशा मोजक्या शब्दात क्षितीज पटवर्धनने रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. क्षितीजने लिहिलेल्या शब्दांचं अनेकांनी कौतुक केलंय.



रतन टाटा यांचं निधन

रतन टाटा यांचे काल वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आज त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCPA मध्ये ठेवण्यात येणार आहे. रतन टाटांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलाय. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Web Title: After Ratan Tata death marathi writer director kshitij patwardhan post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.