शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर आता हा अभिनेता दिसणार रामदास स्वामींच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 07:15 IST2019-10-14T07:15:00+5:302019-10-14T07:15:00+5:30
संभाजी मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता शंतनू मोघे आता रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसणार आहे.

शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर आता हा अभिनेता दिसणार रामदास स्वामींच्या भूमिकेत
छोट्या पडद्यावरील संभाजी मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता शंतनू मोघे आता रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'श्री राम समर्थ'. या चित्रपटात बालवयात निस्सीम रामरायाची भक्ती आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजोपयोगी कामांसाठी देशाटन करणारे राष्ट्रसंत रामदास स्वामी यांचा प्रवास पहायला मिळणार आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ''श्री राम समर्थ'' सिनेमाची मूळ संकल्पना ऍड.विजया माहेश्वरी यांची आहे. घराघरातील संस्कारांचा पाया असलेले" मनाचे श्लोक" याचे उदगाते राष्ट्रसंत रामदास स्वामी यांनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहिलेला 'दासबोध' ग्रंथ आजच्या दैनंदिन कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरतो. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे आणि मार्गदर्शनाचे अनेक पैलू ''श्री राम समर्थ'' सिनेमात उलगडणार आहेत.
लग्नातील ''सावधान'' या शब्दामागील नेमका अर्थ समजावून घेणारा अवघ्या १२ वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या ठायी पाहायला मिळते. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते होते हे देखील सिनेमात पाहण्यास मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्यात रामदास स्वामींची कशाप्रकारे साथ मिळाली हे या सिनेमात दाखविण्यात आले आहे. स्वच्छ परिसर आणि समृद्ध समाज ही चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजवलेली संकल्पना आजही तितकीच महत्वपूर्ण ठरत आहे.
विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि दिशादीपा फिल्म्सच्या दीपा सुरवसे यांची निर्मिती असून हा सिनेमा भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तुत केला आहे. कथा-पटकथा-संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केलं आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, संगीत महेश नाईक आणि संजय मराठे यांनी दिले आहे.
या चित्रपटात शंतनू मोघे सोबत महेश कोकाटे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजया सुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे पाहायला मिळणार आहे.