'सैराट'मधील आर्ची-परशा आले इतक्या वर्षांनंतर एकत्र, दोघांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:38 PM2021-07-23T14:38:13+5:302021-07-23T14:38:33+5:30
२०१६ साली सैराट चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटातील आर्ची-परशाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः याड लावले.
२०१६ साली सैराट चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटातील आर्ची-परशाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः याड लावले. या चित्रपटाला यंदा पाच वर्षे पूर्ण झाले तरीदेखील हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातून आर्ची आणि परशा घराघरात पोहचले. आर्चीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरूने साकारली होती तर परशाची भूमिका आकाश ठोसरने. या चित्रपटातून दोघे एका रात्रीत लोकप्रिय झाले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर ते दोघे एकत्र आले आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूनेआकाश ठोसरसोबतचे फोटो शेअर करत म्हटले की, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर जुन्या मित्राला भेटल्यानंतर खूप आनंद झाला. भेटल्यानंतर ती फिलिंग अजून बदलली नाही.
रिंकू राजगुरूने शेअर केलेला फोटो पाहून त्या दोघांमध्ये खूप बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. ते दोघे झुंड या हिंदी चित्रपटासाठी एकत्र आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहते पुन्हा सैराट २ कधी येणार असे विचारत आहे. तर काही युजर्स परशा आर्चीची जोडी खूप छान वाटते अशी कमेंट करत आहेत.
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरने सैराट चित्रपटानंतर मागे वळून पाहिले नाही. त्या दोघांनी त्यानंतर चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केले. रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने कागर, मेकअप या चित्रपटात काम केले. तसेच हंड्रेड वेबसीरिज आणि नेटफ्लिक्सवरील अनपॉज्डमध्ये ती झळकली.
आता ती झुंड या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. अमोल पालेकर यांच्यासोबत जस्टिस डिलिव्हर्ड या वेबसीरिजमध्ये ती काम करताना दिसणार आहे. तसेच छूमंतर चित्रपटात तिने काम केले आहे.
तर आकाश ठोसरच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याने सैराटनंतर एफयूः फ्रेंडशिप अनलिमिडेट चित्रपटात काम केले. हिंदी वेबसीरिज लस्ट आणि १९६२ः द वॉर इन द हिल्समध्ये त्याने काम केले. आकाशदेखील झुंड चित्रपटात दिसणार आहे.