'भरभरुन प्रेम देणारी माय आता भेटत नाही', आईच्या आठवणीत अभिनेते अजिंक्य देव झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:12 PM2023-09-12T14:12:40+5:302023-09-12T14:31:44+5:30
सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावूक झालेले दिसले. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय.
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गेल्या महिन्यात वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. बऱ्याच दिवसांपासून त्या अल्झायमरने आजारी होत्या. सीमा देव यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्याशी विवाह केला होता. अभिनय देव व अजिंक्य देव ही त्यांची दोन्ही मुले मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावूक झालेले दिसले. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय.
नुकतेच अजिंक्य यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये आई असं लिहीलं. अजिंक्य यांनी आईसाठी एक चारोळी म्हटली. “भरभरून प्रेम देऊनही माया जिची आटत नाही. सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही". अजिंक्य यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ भावुक करणारा आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं.
शिवाय, काही दिवसांपुर्वी अजिंक्य यांनी सोशल मीडियालवर रमेश देव आणि सीमा देव यांचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, ''आई-बाबा दोघे ही गेले राहिल्या फक्त आठवणी… सुंदर गोड आठवणी.''
अजिंक्य देव यांचे वडील आणि दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं फेब्रुवारी २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर आता दीड वर्षांनी सीमा देव यादेखील स्वर्गवासी झाल्या. सीमा देव यांनी १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांनी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यांचे ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट प्रचंड गाजले. त्यांनी मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं होतं.