अक्षय केळकर आणि निशाणी बोरुळे झळकणार रोमँटिक अल्बममध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:05 PM2019-03-22T16:05:30+5:302019-03-22T16:06:58+5:30
चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि टाइम्स म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने 'आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं' या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. कुणी मित्र-मैत्रीणीच्या साहाय्याने आपले प्रेम प्रेयसीपर्यंत पोहोचवू पाहतो तर कुणी चिट्टी, ब्लँक कॉल्स यांसारख्या अनेक युक्त्या लढवल्या जातात. प्रेमात आणि युद्धात सारे काही माफ असते म्हणतात, त्याला अनुसरूनच चेतन गरुड प्रोडक्शन्सचे आणखी एक रोमँटिक साँग होळीच्या रंगात न्हाऊन निघाले. 'आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं' असे बोली भाषेतले हे गाणे एका लहान निरागस मुलाच्या मदतीने प्रेमवीरांची लव्हस्टोरी उलगडून दाखवण्यास मदत करतो.
चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि टाइम्स म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने 'आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं' या गाण्याची निर्मिती करण्यात आली असून सुप्रसिद्ध गायक वैभव लोंढे आणि चेतन गरुड यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा जुळून आली आहे. हे गाणे सुनील वाहूळ यांच्या लेखणीतून साकार झाले असून या गाण्याला संगीतदेखील त्यांनीच दिले आहे.
निशाणी बोरुळे आणि अक्षय जयेंद्र केळकर यांच्यासोबतच विनीत शेट्टी, सुरज अलंकार आणि चैताली पाटील यांचाही या गाण्यात सहभाग आहे. मंचरजवळील चपाटेवाडी येथील सुंदर लोकेशन्सवर खुलणाऱ्या या प्रेम कहाणीचे दिग्दर्शन शुभम भुजबळ यांचे आहे तर उत्तम सिनेमॅटोग्राफी कमलेश शिंदे यांनी केलेली आहे.
विशेष म्हणजे या गाण्यासाठी ड्रोनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे निसर्गसौंदर्य आणखी खुलून आले आहे असा म्हणता येईल आणि त्याचे श्रेय गोपाळ शिंदे याना जाते. राहुल झेंडे संकलक, वेष-केशभूषा प्रतीक्षा काकडे आणि तिशा मेश्राम आणि निर्मिती आदित्यराजे मराठे यांनी केले आहे.