अक्षय कुमारने प्रकाशित केला मराठी चित्रपट ‘चुंबक’चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 09:45 AM2018-07-06T09:45:43+5:302018-07-06T09:46:32+5:30

प्रसन्नाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या स्वानंद किरकिरे यांनी सामाजिक माध्यमांवर बोलताना म्हटले आहे की, हा चित्रपट त्यांनी करण्याचे ठरवले त्याचे एकमेव कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा.

Akshay Kumar published Marathi film 'chumbak' trailer | अक्षय कुमारने प्रकाशित केला मराठी चित्रपट ‘चुंबक’चा ट्रेलर

अक्षय कुमारने प्रकाशित केला मराठी चित्रपट ‘चुंबक’चा ट्रेलर

googlenewsNext
ठळक मुद्देस्वानंद किरकिरे यात एका छोट्या खेड्यातून आलेल्या प्रसन्नाची भूमिका साकारत आहेत. 

बॉलीवूडचा आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारचे सादरीकरण असलेला चित्रपट म्हणून ज्याची प्रतीक्षा समस्त मराठी चित्रपटसृष्टीला लागली आहे, त्या ‘चुंबक’चा ट्रेलर स्वतः अक्षय कुमारने गुरुवारी ५ जुलै रोजी प्रकाशित केला. 

यावेळी प्रख्यात गीतकार, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे आणि चित्रपटातील इतर कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. त्यांत प्रमुख भूमिकेतील संग्राम देसाई आणि साहिल जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदी, लेखक सौरभ भावे यांचा समावेश होता. चित्रपटाचे निर्माते कायरा कुमार क्रिएशन्सचे नरेन कुमार तसेच केप ऑफ गुड फिल्म्सचे सदस्यही जुहू येथील पीव्हीआर सिनेमा येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

या ट्रेलरच्या शुभारंभप्रसंगी चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, आयुष्यात कशाची निवड करायची याबद्दल या चित्रपटात भाष्य आहे. “आधी तुम्ही निवड घडवता आणि नंतर त्या निवडी तुम्हाला घडवतात,” तो म्हणाला. या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची केलेली निवड ही अक्षयने अगदी हेतुपुरस्सर आणि चित्रपट पाहिल्यानंतर आलेल्या भावनेतून केलेली आहे.  

प्रसन्नाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या स्वानंद किरकिरे यांनी सामाजिक माध्यमांवर बोलताना म्हटले आहे की, हा चित्रपट त्यांनी करण्याचे ठरवले त्याचे एकमेव कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा. ही व्यक्तिरेखा साकारणे हे एक मोठे आव्हान तर होतेच पण आयुष्यातील ती एक महत्वाची भेटही होती. या व्यक्तिरेखेने आयुष्यातील काही महत्वाचे धडेही दिले आणि आयुष्य कायमस्वरूपी बदलूनही  टाकले, असेही ते म्हणाले.  

दिग्दर्शक संदीप मोदी आणि निर्माते नरेन कुमार यांनी म्हटले आहे की, ‘चुंबक’ हा साध्या सरळ माणसांच्या आयुष्यातील घटनांवर आणि त्यांच्या आयुष्यातील द्विधा मनस्थितींवर आधारित एक वेगळा चित्रपट आहे. म्हणूनच ही कथा आपल्याला आपली वाटते.  

बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने सामाजिक माध्यमांवर अस्खलित मराठीत या चित्रपटाची  प्रस्तुती तो करणार असल्याची घोषणा केल्यापासून ‘चुंबक’चा चित्रपटसृष्टीत बोलबाला आहे. चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया, नरेन कुमार आणि केप ऑफ गुड फिल्म्सनी केली असून दिग्दर्शन संदीप मोदी यांनी केले आहे. चित्रपट २७ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 
 

चित्रपटाचा पहिला टीझर आणि पोस्टर काही आठवड्यांपूर्वी प्रकाशित करण्यात आली होती. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटाच्या चमूने त्यातील पोस्टर आणि तीन मुख्य पात्रांच्या परिचयांची झलकही नुकतीच प्रकाशीत केली होती. त्यातील एक होती स्वानंद किरकिरे करत असलेल्या प्रसन्ना ठोंबरे या व्यक्तिरेखेची. पहिल्यांदाच प्रमुख भूमिका रंगवत असलेल्या स्वानंद किरकिरेने सोलापूरजवळील एका छोट्या खेड्यातून आलेल्या प्रसन्नाची भूमिका अदा केली आहे. 
 

स्वानंद किरकिरे म्हणतात, “मला सुरुवातीला असे वाटले की या चित्रपटाच्या संगीतासाठी चित्रपटाची टीम मला भेटते आहे. पण माझ्याकडून त्यांना अभिनय करून घ्यायचा आहे आणि त्यातही ही मुख्य भूमिका आहे, असे जेव्हा मला कळले तेव्हा मला धक्काच बसला. ही भूमिका म्हणजे एक आव्हान होते. पण चित्रपटाची पटकथा ऐकली आणि माझ्यावरील या टीमचा विश्वास बघितला व आम्ही म्हणजे मी, संदीप, सौरभ आणि नरेन यांनी त्यात उडी घ्यायचे ठरवले.”
 

“एक निरागस आणि गतिमंद अशा पुरुषाची व्यक्तिरेखा आम्हाला उभी करायची होती. आपल्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण करत आणि त्याच्या जोडीला या क्षेत्रातील डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याशी चर्चा करत ही व्यक्तिरेखा आकाराला आली आहे. ही व्यक्तिरेखा आम्ही एक एक वीट रचावी तशी अभ्यासत आणि सकारात गेलो. त्यातून त्यातील प्रेमळपणा या व्यक्तिरेखेत येत गेला आणि तिची प्रतिष्ठाही राखता आली,” असे उद्गार दिग्दर्शक संदीप मोदी यांनी काढले.

Web Title: Akshay Kumar published Marathi film 'chumbak' trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.