भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:29 PM2024-05-17T17:29:43+5:302024-05-17T17:30:40+5:30
Alka Kubal: 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला. विशेष म्हणजे अलका कुबल यांच्या हातून हा सिनेमा थोडक्यात गेला.
मराठी कलाविश्वातील सोज्वळ, लोभसवाणा चेहरा म्हणजे अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal). आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे अलका कुबल यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. त्यातच माहेरची साडी या चित्रपटाने त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये,दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अलका यांना संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करायची संधीदेखील मिळाली होती. मात्र, एका गोष्टीमुळे त्यांच्या हातून बाजीराव मस्तानी सारखा सिनेमा त्यांच्या हातून गेला.
संजय लीला भन्साळी यांचा 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला. विशेष म्हणजे या सिनेमा अलका कुबल यांना घ्यावं अशी भन्साळींची इच्छा होती. यासाठी त्यांनी अलका कुबल यांच्याशी संपर्कही साधला होता. मात्र, सिनेमाचं सगळं फायनल होता होता त्यांची एकमेकांसोबत काम करायची संधी चुकली. अलका कुबल यांनी अलिकडेच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी घडलेला किस्सा सांगितला.
'बाजीराव मस्तानी' या सिनेमाच्या वेळी संजय लीला भन्साळी यांनी तुम्हाला एक भूमिका ऑफर केली होती. मात्र, हे गणित नेमकं का जुळून आलं नाही?' असा प्रश्न अलका यांना विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी घडलेला किस्सा सांगितला.
या कारणामुळे यांनी गमावला बाजीराव-मस्तानी
"त्यावेळी मी कलर्स मराठीवरच्या एका मालिकेचं शूट करत होते आणि बाहेरगावी होते. सतत दौरे सुरु होते आणि त्यांच्या (संजय लीला भन्साळी) प्रोडक्शनमधून मला फोन येत होते की, प्लीज तुम्ही या लवकर. पण, मी म्हटलं की मी याच अमूक अमूक तारखेला मुंबई येणार आहे. मी शूट कॅन्सल करुन येऊ शकत नाही. खरं तर माझे आवडते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. मुळात ते किंवा मणिरत्नम हे कोणाचे आवडते नसतील. तर, मला खूप आनंद झाला की, एवढे मला कॉल येतायेत तर नक्कीच माझं काम होणार", असं अलका कुबल म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "मुंबईत आल्यावर मी त्यांना भेटायला गेले. मला वाटलं नाही की ते मला एवढा वेळ देतील. माझे ऑडिशन्स झाले पण माझा चेहरा एवढा सिंपल आणि सोबर होता की ते मला म्हणाले, 'अलकाजी, आपका फेस इतना सोबर हैं. पर, ये लूक थोडा ऐसे चाहिए इसलिए मैं आपको इसमें कास्ट नहीं कर सकता', असं संजय लीला भन्साळी म्हणाले. पण, मी वाट पाहतीये त्यांनी अशा एका रोलसाठी मला बोलवावं. मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं त्या माणसाने (भन्साळी) माझे बरेच सिनेमा पाहिले होते. त्यांनी माझ्या सिनेमांची नाव घेऊन सांगितलं. याच गोष्टीचं मला खूप नवल वाटलं."