दिस सरले! अमेय वाघनं शेअर केला लग्नाचा Unseen Video, म्हणाला, "आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:37 IST2025-01-06T09:37:14+5:302025-01-06T09:37:42+5:30
अमेय वाघने त्याच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दिस सरले! अमेय वाघनं शेअर केला लग्नाचा Unseen Video, म्हणाला, "आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस"
Amey Wagh-Sajiri Deshpande Wedding Video : प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा त्याच्या हटके अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. नाटक, सिनेमा आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अमेय लवकरच 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फसक्लास दाभाडे' (Marathi Movie Fussclass Dabhade) हा सिनेमा 24 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असून अमेय हा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच या चित्रपटातील 'दिस सरले' हे Wedding Anthem प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यानिमित्ताने अमेय यानेही त्याच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अमेयच्या लग्नाच्या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अमेयने त्याची पत्नी साजिरी देशपांडेबरोबर (Sajiri Deshpande) लग्न लागतानाचे काही क्षण या व्हिडीओमधून शेअर केले आहेत. त्याने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, "आमच्या सिनेमातलं हे गाणं ऐकल्यावर माझा लग्नाचा दिवस आठवला! आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस आणि आमच्या 'फसक्लास दाभाडे' मधलं सगळ्यात सुंदर गाणं 'दिस सरले'! 'फसक्लास दाभाडे' २४ जानेवारी पासून आपल्या फॅमिली सकट जवळच्या चित्रपटगृहात!". या व्हिडीओला अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
अमेय आणि साजिरीची लव्हस्टोरी पुण्याच्या कॉलेजमध्ये सुरु झाली होती. साजिरी अमेयच्या कॉलेजमधील नाटकाची तालीम पाहायला यायची. अमेयला पाहिल्यानंतर साजिरी त्याच्या प्रेमात पडली आणि इथून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. 13 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्याने साजिरीशी लग्नाचा निर्णय घेतला होता. अमेय आणि साजिरी हे 2017 साली विवाह बंधनात अडकले. अमेय आणि साजिरी यांचा सुखाचा संसार सुरू असून दोघेही धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
दरम्यान, 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा ट्रेलर हा ८ रोजी प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघशिवाय, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची कथा पाहायला मिळणार आहे. दाभाडेंच्या घरातील या तीन खांबांना भेटणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.