आयुष्य नाटकापेक्षा कमी नाही..; अमृताचं स्वप्न पूर्ण होताच लिहीलेली भावनिक पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:04 PM2024-03-09T14:04:08+5:302024-03-09T14:05:03+5:30
अमृता देशमुखने पाहिलेलं अनोखं स्वप्न पूर्ण झालंय. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीलीय
अमृता देशमुख ही मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. अमृताला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. मालिका असो, चित्रपट असो किंवा नाटक असो. अमृता सध्या विविध माध्यमांत कार्यरत आहे. अशातच अमृताने खुप वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय. अमृताला झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्ताने अमृताने भावनिक पोस्ट लिहीली आहे.
अमृताने झी नाट्य गौरव पुरस्कार स्वीकारतानाचा खास क्षण पोस्ट करुन लिहीलं की, "झी नाट्य गौरव" हा असा सोहळा आहे जो मी आमच्या छोट्याश्या TV वर उत्साहाने बघायचे...आणि स्वप्नं सुद्धा बघायचे..तिथे असण्याची..कितीही नाट्यमय वाटलं तरी खरंच होतं तसं...! आता जेव्हा "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- व्यावसायिक नाटक" ची ट्रॉफी माझ्या हातात बघते..तेव्हा आयुष्य एखाद्या नाटकापेक्षा कमी नाही वाटत.."
अमृताने पुढे पोस्ट लिहीलीय की, "ज्यांनी ही संधी दिली ते प्रशांत दामले सर आणि माझं नाव "नियम व अटी लागू" साठी त्यांना सुचवणारी कविता ताई...ह्यांच्याच हस्ते हा पुरस्कार मला मिळाला हा "निव्वळ योगायोग" ! खरं सांगायचं तर हे दोघे स्टेज वर आले तेव्हा तर माझी खात्रीच पटली की "छे! असा योग खऱ्या आयुष्यात नाही"च" येत!" आणि म्हणूनच वाटतं.. “क्या पता हम में है कहानी या हैं कहानी में हम?”