अमृता खानविलकरचा पहिला बायोपिक, साकारणार 'ललिता शिवाजी बाबर'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 12:31 PM2023-01-26T12:31:29+5:302023-01-26T12:32:20+5:30
Amruta Khanvilkar : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या चित्रपटात मुख्य भूमिका अमृता खानविलकर साकारणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अमृताने मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. आता ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती ललिता शिवाजी बाबरची भूमिका साकारताना दिसणार आहे.
जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा 'ललिता शिवाजी बाबर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. आजवर अनेक हिंदी शोज, चित्रपट राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे एंडेमॅाल शाईनं इंडिया आणि मराठी कॅान्टेन्टला एका वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणार, हे नक्की! ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे.
याबद्दल अमृता खानविलकर म्हणाली की, एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.