मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झाला आनंद अभ्यंकरांचा अंत; असा घडला होता भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:35 AM2023-05-30T10:35:18+5:302023-05-30T10:35:55+5:30
Anand abhyankar: असा झाला आनंद अभ्यंकरांचा दुर्दैवी मृत्यू; आजही त्या अपघातामुळे अनेकांच्या अंगावर काटा येतो.
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेता आनंद अभ्यंकर (anand abhyankar) यांचं निधन होऊन आज जवळपास ११ वर्ष झाली. मात्र, त्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. अनेक दर्जेदार मालिका, सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारुन त्यांनी लोकप्रियता मिळवली होती. विशेष म्हणजे यशाच्या शिखरावर असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली. आजही त्यांचा तो अपघात आठवला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो.
आनंद अभ्यंकर यांनी 1999 मध्ये 'वास्तव' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’, 'मला सासू हवी', 'असंभव' यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर त्यांनी 'जिस देश में गंगा रहता है', 'मातीच्या चुली', 'स्पंदन' या सिनेमांमध्ये काम केलं. सोबतच हिंदी मालिकांमध्येही काम केलं. परंतु, करिअरचा आलेख उंचावत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. एका अपघातामुळे त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
कसा झाला आनंद अभ्यंकरांचा मृत्यू
२३ डिसेंबर २०१२ मध्ये आनंद अभ्यंकर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करत होते. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता अक्षय पेंडसे आणि त्याचा लहान मुलगादेखील होता. हा प्रवास करत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या मारुती व्हॅगनार या गाडीला जोरात धडक दिली. या धडकेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी आनंद यांचं वय केवळ ५० वर्ष होतं.
दरम्यान, त्यावेळी आनंद अभ्यंकर मला सासू हवी या मालिकेचं चित्रीकरण करत होते. त्यामुळे ही मालिका त्यांच्या करिअरमधली शेवटची मालिका ठरली. आनंद यांची लेकदेखील कलाविश्वात सक्रीय आहे. सोबतच ती उत्तम कथ्थक नृत्यांगनादेखील आहे.