आनंद शिंदे म्हणतायेत 'आली फुलवली'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:51 PM2019-02-12T13:51:23+5:302019-02-12T13:52:28+5:30
चेतन गरुड प्रोडक्शन आणि एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंटची फुलवाली प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी चेतन गरुड प्रोडक्शन्सची दिलखेच गाणी सध्या अबाल-वृद्धांच्याही ओठी रुळली आहेत. 'खंडेराया झाली माझी दैना' आणि 'सुरमई'ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चेतन गरुड आणखी एक हिट गाणे प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.
सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेंनी आपल्या हटके अंदाजात गायलेल्या 'आली फुलवाली' या अल्बमलासुद्धा तरुणांनी डोक्यावर नाही घेतले तरच नवल. चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 'आली फुलवली' हा सिंगल अल्बम वाजवा मराठी या युट्युब चॅनलवर झळकणार असून लवकरच हे गाणे इतर सोशल पोर्टल्सवर आणि म्युझिक चॅनेल्सवर तुम्हाला पाहता येईल.
पिंपळगाव हरेश्वर या छोट्याशा गावातील चेतन रवींद्र गरुड या तरुणाने २०१८ मध्ये मराठी सिंगल अल्बममध्ये 'खंडेराया झाली माझी दैना' हे सर्वात लोकप्रिय गाणे मराठी प्रेक्षकांना दिले जे सर्वत्र जोरदार वाजले आणि गाजले देखील. आता प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असून त्यांनी आपले तिसरे गाणे २०१९ च्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट यांचे तिसरे गाणे 'आली फुलवाली' ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झाले.
चेतन मोहतुरे आणि अस्मिता सुर्वे या नवोदित जोडीवर चित्रीत केलेले हे गाणे शप्पिद शेख यांनी लिहिले व संगीतबद्ध केले आहे. राहुल झेंडे दिगदर्शित 'आली फुलवाली' या अल्बमच्या शीर्षकवरूनच आपल्या लक्षात येईल हे गाणे एका फुलवालीला उद्देशून लिहिले गेलेले असून त्यातली कलरफुल फुलवाली सगळ्यांची मनं जिंकेल यात शंका नाही. या गाण्याच्या मागणीनुसार त्यासाठी सेटही तसाच फ्रेश ठेवण्यात आला, ज्याचे कला दिग्दर्शन हिना एस.के. यांनी सांभाळले आहे. चेतन महाजन (नानू) आणि रोहन राणे यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली जमून आलेला 'आली फुलवाली'चा फक्कड ठेका साऱ्यांनाच ताल धरायला लावेल. अल्बमला साजेशी वेशभूषा रश्मी मोखळकर यांची आहे तर या अल्बमचे संकलन राहुल झेंडे यांनी केले आहे शिवाय रवी उच्चे यांचे उत्कृष्ट छायांकन 'आली फुलवाली'ला लाभले आहे.