आनंद शिंदे यांना या गोष्टीची आजही वाटते सल, त्यांनीच दिली कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 06:56 PM2021-03-04T18:56:10+5:302021-03-04T18:57:23+5:30
आज आनंद शिंदे हे प्रसिद्ध गायक असून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. पण त्यांचे बालपण हे अतिशय हलाखीत गेले.
आनंद शिंदे यांनी एकाहून एक सरस गाणी मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. त्यांच्या सगळ्याच गाण्यांवर रसिक मनसोक्त ताल धरतात. त्यांच्या आवाजात जादू आहे असे म्हटले तरी ते चुकीचे नाही. आज आनंद शिंदे हे प्रसिद्ध गायक असून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. पण त्यांचे बालपण हे अतिशय हलाखीत गेले.
आनंद शिंदे यांचे वडील प्रल्हाद शिंदे हे प्रसिद्ध गायक होते. पण त्याकाळात गायकाला तितकेसे पैसे मिळत नसत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. टीव्ही नाईनने दिलेल्या वृत्तानुसार, आनंद शिंदे यांचा जन्म झाला, त्यावेळी त्यांचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. पण ते आल्यानंतर धुमधडाक्यात त्यांचे बारसे करण्यात आले. दहा हजारांच्या नोटांवर त्यांना झोपवून त्यांचे बारसे करण्यात आले होेते. आनंद शिंदे यांच्या कुटुंबियांनी अनेकवेळा घरं बदलली. सुरुवातीला ते मुंबईतील प्रसिद्ध अशा कामाठीपुरा या परिसरात राहात होते. त्यानंतर ते मुंबईतील काही ठिकाणी राहिले आणि अखेरीस कल्याण येथील कोळसेवाडीत स्थिरावले. सतत घर बदलत असल्याने आनंद शिंदे यांना शाळादेखील नेहमी बदलावी लागत असे. काही काळ ते आजोळी देखील राहिले. पण या सगळ्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला आणि त्यांचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झाले. पण त्यांना शिक्षण घेता आले नसले तरी त्यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगले शिक्षण दिले.
आनंद शिंदे यांचे लग्न वयाच्या अठाराव्यावर्षी झाले. पत्नीला देण्यासाठी त्यांच्याकडे त्यावेळी सोन्याचे मंगळसूत्र देखील नव्हते. या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटले होते. त्यामुळे पैसे आल्यानंतर त्यांनी पत्नीसाठी पायातील जोडवी देखील सोन्याची केली होती.