असा झाली निर्मिती दमदार अॅक्शनपट 'रॉकी'ची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 03:20 PM2019-03-01T15:20:43+5:302019-03-01T16:15:14+5:30
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये अॅक्शनपॅक्ड विषयांवर असंख्य सिनेमांची निर्मिती होत असली तरी मराठीत मात्र ... अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात.
चित्रपट निर्मिती ही नेहमीच आव्हानात्मक गोष्ट असते. हिंदी चित्रपटांबरोबरच प्रादेशिक चित्रपटांची मोठी बाजारपेठ लक्षात घेऊन प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांची निर्मितीसाठी अनेक निर्माते पुढे सरसावू लागले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या काही निर्माते एकत्र येऊन चित्रपट निर्मिती करताना दिसतात. आशयघन आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या लक्षणीय प्रतिसादामुळे अनेक बड्या कॉर्पोरेट कंपन्यासुद्धा चित्रपट व्यवसायात गुंतवणूक करू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी रॉकी या चित्रपटासाठी प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू आशर असे चार निर्माते एकत्र आले आहेत.
आपल्या या पहिल्या-वाहिल्या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना पेशाने इंजिनिअर असलेले नितीन, मनेश आणि प्रशांत हे तिघेजण सांगतात की, आम्ही तिघंजण कॉलेजपासून नेहमीच एकत्र होतो आणि आहोत, चित्रपट या माध्यमाबद्दल सगळ्यांप्रमाणेच आम्हालाही उत्सुकता होती. सगळ्यांनी मिळून एखादा चित्रपट करावा असे स्वप्न मनात घर करू लागले होते. त्याचवेळी प्रशांत त्रिपाठी यांच्या पत्नी सुनीता त्रिपाठी यांच्या ओळखीतून अदनान ए शेख यांच्या संपर्कात आलो. त्यालाही त्याच्या मराठी चित्रपट दिग्दर्शनाचे स्वप्न पूर्ण करायचे होते आणि आम्हालाही एक चांगले कथानक असलेला चित्रपट करायचा होता. या सगळ्याचा विचार करता चित्रपट निर्मितीसाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे हे तिघेजण सांगतात. त्यानंतर हिमांशू अशर यांनीसुद्धा या चित्रपटासाठी आपली रुची दाखवत निर्मितीसाठी सहकार्याचा हात पुढे केला आणि आता सेवेन सीज प्रोडक्शन्स आणि ड्रीम व्हिवर प्रोडक्शन्स या दोन कंपन्यांच्या माध्यमातून हा चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे नृत्यदिग्दर्शन अहमद खान या चित्रपटाशी जोडले असून त्यांच्या पेपरडॉल एन्टरटेन्मेंट या कंपनीने चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये अॅक्शनपॅक्ड विषयांवर असंख्य सिनेमांची निर्मिती होत असली तरी मराठीत मात्र ... अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी हटके मसालेदार विषय घेऊन येण्याचा आमचा मानस होता. रॉकी चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूड स्टाइल चित्रपट मराठीत आणल्याचा आनंद व्यक्त करतानाच प्रेक्षकसुद्धा हा चित्रपट उचलून धरतील असा विश्वास हे चार निर्माते व्यक्त करतात. रॉकी चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉकी चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचा ही निर्मात्यांचा विचार आहे.
रॉकी आणि संजना यांच्यात प्रेमाचं नातं फुलत असताना या दोघांच्या आयुष्यात एक अकल्पित घटना घडते. या घटनांचा शोध घेताना रॉकीला कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो, तो त्याला कसे तोंड देतो? ह्या सगळ्या घटनांचा शोध घेण्यात रॉकी यशस्वी होतो की तोच यामध्ये स्वतः अडकतो ? या प्रश्नांची उत्तरे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन ‘रॉकी’ पाहावा लागेल.